संतोष आवारे | अहमदनगर महापौर निवडणुकीसाठी सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येणे अपेक्षित असताना, सेना-राष्ट्रवादीने युती करत काँग्रेसला डावलल्याची तीव्र भावना स्थानिक नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक येत्या 30 जूनला घोषित करण्यात आली आहे. पहिल्या टर्मला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर निवडून आला होता, मात्र आता राज्यात महाविकास आघाडी असल्याने सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापण करणे अपेक्षित आहे. तसेच महापालिकेतील सत्तेसाठीचा जादुई आकडा महाविकास आघाडीकडे आहे. 68 नगरसेवक असलेल्या अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचे 23, राष्ट्रवादीचे 19 आणि काँग्रेस पक्षाचे पाच असे आघाडीचे तब्बल 47 नगरसेवकांचे बळ आहे. इतके असून सुद्धा सेना-राष्ट्रवादी कडून काँग्रेसला बाजूला ठेवले जात असल्याची तीव्र भावना स्थानिक नेत्यांकडून व्यक्त होत आहे. एकूणच काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागून आहे.
शिवसेनेने महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांची उमेदवारी अंतिम केल्याचे बोलले जातेय, तर महापालिकेत केवळ पाच नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या काँग्रेसच्या शीला दिप चव्हाण यांच्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात आग्रही आहेत. मात्र निवडणूकपूर्व हालचालीत काँग्रेसलाच बाजूला ठेवल्याची परस्थिती असताना होणारा महापौर हा महाविकास आघाडीचा होणार की सेना-राष्ट्रवादी युतीचा होणार याकडे नगरकरांचे लक्ष आहे.