महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट जरी कमी होत असली तरी कोरोना संसर्ग कायम आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने प्रशासकीय बदल्यांना केवळ 14 ऑगस्टपर्यंत परवानगी दिलीय. मात्र, 14 ऑगस्टनंतर कोणत्याही बदल्या करता येणार नाही, असे आदेश दिले आहेत. या आदेशात 14 ऑगस्टपर्यंत केवळ विहित कालावधी पूर्ण झालेल्या 15 टक्के मर्यादित सर्वसाधारण बदल्या करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
"सद्यस्थितीत महाराष्ट्र हे कोरोनाबाधित राज्य आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेता बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित करण्यात येत आहे. सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या 15 टक्के एवढ्या मर्यादेत बदली अधिनियमातील कलम 6 अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने कराव्यात. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संबंधित पदावर कार्यकाळ पूर्ण झालाय अशाच बदल्या कराव्यात. या बदल्यांची कार्यवाही 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी. यानंतर जी पदं रिक्त राहतील त्या पदांवर विशेष कारणास्तव बदल्या करण्यास 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या काळात परवानगी असेल." असे आदेशात म्हटले आहे.