खंडाळा : मुंबई-पुणे महामार्गावर मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. लोणावळ्याजवळ ओव्हर ब्रीजवर ऑईल टँकरचा अपघात झाल्याने भीषण आग लागली आहे. यामुळे ब्रीज खाली असलेल्या गाड्यांना देखील आग लागल्याची समजत आहे. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे.
या अपघातातील मृतकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.