मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिकेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या म्हणजेच ११ मार्चला लोकार्पण होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी ११ वाजता वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ मार्चपासून सकाळी ८ वाजेपासून मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. या मार्गावर प्रवास करण्याचं वेळापत्रक देखील समोर आलं आहे.
मुंबईत दररोज वाढणाऱ्या शेकडो वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांनाही डोकेदुखी ठरत आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे इंधनाची ३४ टक्के तर वेळेची ७० टक्के बचत होणार असून दक्षिण मुंबईचा ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या दहा मिनिटांत होणार आहे. या रोडचा पहिला टप्पा मुंबईच्या दक्षिणेला प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा मार्ग असा आहे. कोस्टल रोड वरळीकडून मरीन ड्राइव्हच्या दिशेने आता खुला करण्यात येणार आहे.
मुंबईतील कोस्टल रोडवर वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिकेवर आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस प्रवास करता येईल. या पाच दिवसात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाहतुकीसाठी वेळ असणार आहे. तर शनिवारी आणि रविवारी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. कोस्टल रोड प्रकल्प एकूण १०.५८ किलोमीटर लांब आहे. या प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे.