पुणे : चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट झाले असून कोविड प्रतिबंधात्मक उपाय करत आहेत. भारतातही सर्व राज्यांना कोरोना अॅडव्हायजरी जारी केली आहे. अशातच पुण्यात परदेशातून आलेला एक रुग्ण कोरोनाबाधित आढळला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान, सध्या पुणे जिल्हयात कोरोनाचे ५४ सक्रिय रुग्ण आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेला एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. पुणे विमानतळावर त्याची कोरोना चाचणी केल्या असता ती व्यक्ती पॉझिटीव्ह असल्याचे समजले आहे. या व्यक्तीचे नमुने जनुकिय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यातून या रुग्णाला कोणत्या व्हेरियंटचा कोरोना झाला आहे हे समोर येईल. सध्या या व्यक्तीला आयोसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, चीनसह काही देशांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना केंद्राने संसर्गविरोधी उपायांना गती दिली आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली जाईल, असे केंद्राने सांगितले होते आणि राज्यांना 27 डिसेंबर रोजी 'मॉक ड्रिल' आयोजित करण्यास सांगितले होते. यात वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन संयंत्रांसह आरोग्य सुविधांची तयारी केली होती.