मुंबईतील (Mumbai) लोअर परेल परिसरात (Lower Parel) रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. लालगाब (Lalbaug) परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क इमारतीला ही आग (Fire at One Avighna Park) लागली आहे. ही आग लागल्यानंतर एका इसमाने इमारतीवरुन बचावासाठी 19व्या मजल्यावरुन उडी घेतली असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, इमारत उंच असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवरुन खाली पडलेला हा इसम इमारतीचा सुरक्षारक्षक असल्याचं बोललं जात आहे.
लालबागचा हा परिसर चिंचोळ्या गल्ल्यांचा आहे. तसंच या परिसरात वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आग विझवण्याच्या कामात अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास आगीची महिती अग्निशमन विभागाला मिळाली. सध्या अग्निशमन दलाचे 14 बंब तसंच इतर संबंधित पथके याठिकाणी दाखल झाली आहेत.
अग्निशमन दलाचे जवान इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मिळत आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान क्रेनच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचले आहेत. ते पाण्याचा मारा करत आहेत. पण आगीपर्यंत पाण्याचा फवारा पोहोचत नसल्याचं दिसून येतं.
एका व्यक्तीचा मृत्यू
अविघ्न इमारतीतून एक व्यक्ती पडतानाचं दृश्यही समोर आलं आहे. आगीमुळे बाहेर पडता येत नसल्याने इमारतीच्या 19 व्या मजल्याच्या गॅलरीत ही व्यक्ती लटकत होती. पण हात सुटल्यामुळे ही व्यक्ती खाली पडल्याचा व्हीडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे. या व्यक्तीचं नाव अरूण तिवारी असून त्याचं वय 30 वर्षे असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक
अविघ्न पार्क इमारत ही मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक मानली जाते. अनेक उच्चभ्रू लोक मोठ्या प्रमाणावर या इमारतीत राहतात.
एकूण 64 मजली ही इमारत असून करी रोड स्थानकाजवळ महादेव पालव मार्गावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी ही इमारत बांधण्यात आलेली आहे. या इमारतीतील घरांची किंमत 13 कोटींच्या घरांत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.