बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यात अभिनेत्री केतकी चितळे आणि बाजीराव धर्माधिकारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कलम 295 A आणि कलम 505 (2) भारतीय दंड संहिता अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी बाजीराव धर्माधिकारी यांनी परळी मध्ये ब्राह्मण एक्य परिषदेचे आयोजन केलं होतं.
याच परिषदेत अभिनेत्री केतकी चितळेने ॲट्रॉसिटी कायद्या बाबत वादग्रस्त विधान केले होते. यामुळे तिने मराठा समाजासह बौद्ध समाज बांधवांच्याही भावना दुखावल्या होत्या. त्यानंतर केतकीचे हे वाक्य समाजात तेढ निर्माण करणारे आहे आणि त्यामुळे तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली होती. याचे पडसाद दलित समाज बांधव आणि मराठा समाजात पाहायला मिळाले. दरम्यान आता या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
केतकीने दलित समाजाबरोबरच मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली जात होती. दरम्यान केतकीच्या भाषणाचा व्हिडिओ या व्हायरल झाला होता. काही लोक ॲट्रॉसिटी ॲक्टचे रॅकेट चालवत असून याबाबत आरटीआय टाका आणि गेल्या 5 वर्षांची माहिती मिळवा, असे आवाहन तिने ब्राह्मण ऐक्य परिषदेत केलं होतं.
दरम्यान, ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी यांना कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद घाडगे यांनी केतकी चितळेबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, आयोजक बाजीराव धर्माधिकारी यांनी मिलिंद घाडगे यांच्या सूचनेला गांभीर्याने न घेतल्यामुळे आयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर देखील परळी शहर पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.