आदेश वाकळे | संगमनेरचे 90 वर्षीय आजोबांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराची चढाई केली आहे. हि चढाई त्यांनी निव्वळ चार तासाच फत्ते केली. हरिभाऊ धोंडीभाऊ कोते असे त्यांचे नाव आहे.त्यांची ही चढाई पाहून तरूण मुले अचंबित झाली आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतूक होत आहे.
संगमनेर येथील साई निरंजन कॉलनीत राहणारे निवृत्त प्राथमिक शिक्षक असणारे हरिभाऊ धोंडीभाऊ कोते असे 90 वर्षीय आजोबांचे नाव आहे. ज्या वयात इतर म्हातारे कोतारे अंथरूणाला खिळून बसले आहेत, त्या वयात या 90 वर्षीय आजोबांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर निव्वळ चार तासात सर केले. या मोहिमेत त्यांच्या सोबत असणारे सहकारी देखील आजोबांचा उत्साह पाहून अचंबित झाले आहे.
गुरुजींनी नोकरीच्या काळात देवठाण,चैतन्यपूर, सुगाव यांसह अतिदुर्गम भागात आदर्श सेवा करत नावलौकिक मिळवला आहे.जीवन जगत असताना कामातील नियमितता व फिरणे यामुळे ऐन नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशी शरीराची ठेवण त्यांनी ठेवत कळसुबाई गड अगदी सहज रीत्या सर केला आहे.प्राथमिक शिक्षक असणारे त्यांचे चिरंजीव लक्ष्मण कोते यांनी त्यांच्या वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना कळसुबाई या ठिकाणी नेण्याचे ठरवले होते व अखेर गुरुजींनी कळसुबाई शिखर मोहिम पूर्ण केली आहे.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होते आहे.