महाराष्ट्र

Wardha: कारंजात 750 कोटींचा नवा वस्त्रोद्योग एमआयडीसी मंजूर

आर्वी विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी असूनही मोठ्या उद्योगांची वानवा आहे.

Published by : Dhanshree Shintre

भूपेश बारंगे | वर्धा: वर्ध्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी असूनही मोठ्या उद्योगांची वानवा आहे. परिणामी, रोजगाराचीही समस्या भेडसावत असल्याने परिसरातील युवकांना गावाबाहेर पडावे लागते, पण बुधवारी गांधी जयंतीदिनी राज्य शासनाने सामंजस्य करार करून कारंजा (घाडगे) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये 750 कोटींच्या गुंतवणुकीतून वस्त्रोद्योग उभारणीचा निर्णय घेतला आहे. या परिसरातील हा पहिलाच मोठा उद्योग असून, आर्वी मतदारसंघासाठीच नाही तर जिल्ह्यासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे.

कारंजा (घाडगे) हे तालुक्याचे ठिकाण असून, नागपूर ते अमरावती महामार्गालगत आहे. येथे दोन टप्प्यांत औद्योगिक वसाहत मंजूर करण्यात आली. साधारणतः 25 वर्षांपूर्वी 30 एकरांत तर 2018 मध्ये 500 एकरांत त्याचा आणखी विस्तार करण्यात आला. औद्योगिक वसाहतीचा विस्तीर्ण परिसर असूनही मोठ्या उद्योगांअभावी बेरोजगारीची समस्या कायम आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच बुधवारी मे. ओफएबी टेक प्रा. लिमिटेड या कंपनीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला आहे. यावेळी औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सचिव वीरेंद्र सिंग, मे. ओफएबी टेक प्रा. लिमिटेड कंपनीचे अशिश मोहपात्रा, योगेश मंदानी, राजेश चावडे, विक्रम सिंग, अनुराग सोनी व एल. एल. सोनी उपस्थित होते. ही कंपनी कारंजा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये 750 कोटींच्या गुंतवणुकीतून वस्त्रोद्योग उभारणार आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीतून जवळपास 15 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील महिला कारागिरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. असून 'हब अँड स्पोक' मॉडेलद्वारे ग्रामीण भागातही उद्योगांना चालना मिळणार आहे. आजूबाजूच्या ग्रामीण भागात कच्चामाल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने त्याचा वापर उद्योगात होईल. परिणामी, या उद्योगामुळे आर्थिक उन्नती होणार आहे.

गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार ओफएबी टेक या कंपनीने महाराष्ट्र शासनासोबत केला आहे. या प्रकल्पात रेडिमेड कपड्यांची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील एमआयडीसीत स्थापित करण्याबाबत कंपनीने निर्णय घेतलेला आहे. या प्रकल्पामुळे 15 हजार रोजगार उपलब्ध होणार असून आर्वी, आष्टी व कारंजा या तीनही तालुक्यांचे चित्र पालटणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

कारंजा येथील एमआयडीसीतील वस्त्रोद्योगासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मजुरी दिली, ही सर्वासाठीच आनंदाची बाब आहे. या प्रकल्पामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटणार असून, तालुक्याला महत्त्वाचे स्थान येणार आहे. दळणवळणाच्याही सुविधा वाढून विकासात भर पडणार आहे.

कारंजा शहरात नव्याने मंजूर एमआयडीसीमध्ये 750 कोटींचा वस्त्रोद्योग येत आहे, ही सर्वांसाठीच आनंददायी बाब आहे. आधी 500 एकरांतील एमआयडीसी आणि आता 750 कोटींचा उद्योग कारंज्यात येत असल्याने शहराचे भाग्यच उजळले आहेत. रोजगाराची निर्मिती होऊन शेतकऱ्यांनाही चांगले दिवस येणार आहेत.

कारंजा शहरामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या गुंतवणुकीचा उद्योग येत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. या उद्योगाकरिता शासनाचे आभारच मानावे लागणार आहे. मंजूर झालेल्या 500 एकरांतील औद्योगिक वसाहतीचा खऱ्या अथनि फायदा होत असून, या उद्योगामुळे बेरोजगार युवक, शेतकरी, महिला आदींना मोठा फायदा होऊन जीवनमान उंचावणार आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव