कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्गिकेचा खर्च 37 हजार 276 कोटींवर गेला असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर (एमएमआरसीएल) अतिरिक्त कर्ज घेण्याची वेळ आली आहे. ‘जायका’ने अतिरिक्त 4,657 कोटींचे कर्ज देऊ केले असून हा कर्जाचा शेवटचा टप्पा आहे. यासाठी नुकताच केंद्र सरकार आणि जायकामध्ये करार झाला आहे. जायकाकडून मेट्रो-3 ला अर्थसाहाय्य दिले जात असतानाच जायकाने एमएमआरसीच्या वडाळा ते सीएसएमटी मेट्रो-11 मार्गिकेलाही अर्थबळ देण्याची तयारी दर्शवली आहे.
एमएमआरसीकडून 33.5 किमीच्या मेट्रो-3 मार्गिकेची बांधणी केली जात आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च 23 हजार 136 कोटी रुपये असा होता. पण आरे कारशेडचा वाद, वृक्षतोड आणि इतर अनेक तांत्रिक अडचणींमुळे ही मार्गिका वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाही. परिणामी प्रकल्प विलंबामुळे खर्चात 10 हजार कोटींनी आणि नंतर पाच हजार कोटींनी वाढ होऊन प्रकल्प खर्च 37 हजार 276 कोटींवर गेला आहे. या मार्गिकेसाठी जायकाकडून कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे खर्च वाढल्याने अतिरिक्त कर्जाची गरजही निर्माण झाली आहे.
मेट्रो 3 साठी आता एमएमआरसीएलला एकूण खर्चाच्या 57 टक्के अर्थात 57.09टक्के अर्थात 21,280 कोटी रुपयांचे कर्ज आवश्यक आहे. आतापर्यंत चार टप्प्यात जायकाने कर्ज दिले आहे. शेवटच्या टप्प्यात 4,657 कोटी रुपयांच्या कर्जाची गरज आहे. त्यानुसार आता ही रक्कम कर्जरूपाने एमएमआरसीएलला मिळणार आहे.