गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट आलेली आहे. दरम्यान राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघातामुळे 25 जणांचा बळी गेला आहे, तर 374 जणांना उष्माघातची बाधा झाली आहे. गेल्या 8 वर्षातील उष्माघाताच्या बळींचा हा उच्चांक ठरला आहे. तर राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात (Nagpur) उष्णाघातामुळं सर्वाधिक बळी गेले असून आतापर्यंत 11 लोकांना जीव गमवावा लागला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली आहे.
बुधवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात (Central Maharashtra, Vidarbha and Marathwada) बऱ्याच ठिकाणी पारा ४३ अंशांच्या वर पोचल्यामुळे उन्हाचे चटके असह्य झाले आहेत. विदर्भासह राजस्थान आणि मध्यप्रदेशातही उष्णतेची लाट आली असून, पुढील पाच दिवस ही स्थिती कायम राहील असा इशारा हवामान खात्याने (weather department) दिला आहे.
दरम्यान विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याची अनुभूती बुधवारी राज्यातील चाळीशीपार गेलेल्या तापमानावरून आली आहे. कोकण वगळता राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरी ४३ अंशावर होते. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
केंद्राचे राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन
देशात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये अत्यावश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून उष्णतेशी संबंधित आजारांवर 'राष्ट्रीय कृती योजना' तयार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी आपल्या पत्रात उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनाबाबत सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक तत्त्वं जारी करावीत, अशी विनंती केली आहे. 1 मार्चपासून सर्व राज्य आणि जिल्ह्यांमध्ये एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाअंतर्गत (IDSP) उष्णतेशी संबंधित आजारांवर दैनंदिन निरीक्षण केलं जात आहे.