शहराला 24 तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार महापालिका प्रशासनाने केला आहे. 24 तास पाणीपुरवठा करण्याइतकी पाण्याची उपलब्धता नसून मुंबईची भौगोलिक स्थिती आणि रचनेमुळे 24 तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग पूर्णत: गुंडाळण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबईला 24 तास पाणीपुरवठा करण्याचे वचन राजकीय पक्षांकडून दिले जाते. मात्र 24 तास पाणी देणे शक्य नाही, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 2014 मध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत वांद्रे व मुलुंड परिसरात 24 तास पाणीपुरवठ्याचा प्रयोगही करण्यात आला होता. त्यावेळी या भागात पाण्याचे तास वाढवण्यात आले होते, पण 24 तास पाणीपुरवठा करता आला नाही. तेवढी पाण्याची उपलब्धता नाही, त्यामुळे ते शक्य नाही, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान दिली.