महाराष्ट्र सरकारने 2022-23 साठी मद्य परवाना शुल्कात वाढ केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व बारमधून वसूल केलेल्या वार्षिक अबकारी शुल्कात 15% आणि वाईन शॉप्ससाठी 70% इतकी वाढ केली आहे. यासंदर्भात, राज्य सरकारने शुक्रवार, 28 जानेवारी रोजी उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उपम यांच्या स्वाक्षरीने राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. मात्र या अबकारी शुल्क दरवाढी विरोधात भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशने (एएचएआर) तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
लोकसंख्येच्या आकारानुसार रेस्टॉरंट्ससाठी फी वाढ 66,500 रुपये (2021-22 मध्ये 57,750 ) तर बारसाठी 7,97,000 रुपयांपर्यंत (2021-22 मध्ये 6,93,000 रुपये) वाढ झाली आहे. राज्यात सुमारे 20,000 बार आणि रेस्टॉरंट्स आहेत ज्यांना अधिक पैसे द्यावे लागतील. या वाढीमुळे, सरकारला अतिरिक्त 300 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, या दरवाढीचा 'अहर' (AHAR) या संस्थेने निषेध केला आहे.' उद्योगासाठी हा मोठा धक्का आहे. विशेषत: जेव्हा असोसिएशनने राज्य सरकारला FL-III परवाना शुल्कात 50 टक्के माफीची विनंती केली, तेव्हा अडचणीत सापडलेल्या उद्योगाला पाठिंबा द्यावा लागेल, असं 'अहर'नं म्हटलं आहे.