गोपाल व्यास | वाशिम | संसर्गाच्या संकट काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील 23 खासगी रुग्णालयांना कोविड केअर हॉस्पिटलचा दर्जा बहाल करण्यात आला. संबंधित रुग्णांकडून देयक आकारणीचे शुल्कही ठरवून देण्यात आले. त्या अनुषंगाने प्रशासकीय पथकांकडून 'ऑडिट' करण्यात आले शल्य चिकित्सकांकडून प्रशासनाला 1 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला आहे. त्यात प्रथमदर्शनी 12 रुग्णालये अडचणीत सापडणार असल्याचे दिसून येत आहे.
या जिल्ह्यात एप्रिल 2020 या महिन्यात कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला. फेब्रुवारी 2021 पर्यंत संसर्गाची ही पहिली लाट कायम राहिली. त्यात सुमारे साडेसात हजार कोरोना बाधित निष्पन्न झाले. तसेच आलेल्या दुसऱ्या लाटेने मात्र संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजविला. या लाटेत 34 हजारांवर नवे रुग्ण निष्पन्न झाले. दरम्यान, शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय व साधने मर्यादित स्वरूपात असल्याची बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी शासकीय निर्देशानुसार जिल्ह्यात 23 खासगी रुग्णालयांना कोविड बाधितांवर उपचार करण्याची मुभा प्रदान केली होती.
23 रुग्णालयांना कोविड रुग्णांकडून आकारावयाचे शुल्क ठरवून देण्यात आले. त्यापेक्षा अधिक रक्कम आकारल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. अशी सक्त सूचनाही देण्यात आली. असे असताना संसर्गाच्या पहिल्या लाटेत कोविड बाधितांवर करण्याची उपचार परवानगी मिळालेल्या सिक्युरा हॉस्पिटलने 334 रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारल्याचे आढळून आले. ही रक्कम 19 लाख 67 हजार 769 इतकी असून प्रशासनाच्या आदेशावरून 151 रुग्णांना रक्कम परत करण्यात आली तर 183 रुग्णांची रक्कम परत करण्याची प्रक्रिया अद्यापही प्रलंबित आहेत. यासह नवजीवन हॉस्पिटलनेही 20 रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारल्याचे सिद्ध झाले होते. या हॉस्पिटलने त्यापैकी 19 रुग्णांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क परत केले. आता उर्वरित 12 रुग्णालयांचा अहवाल प्राप्त झाला असून संबंधित रुग्णालयांवर नेमकी काय कार्यवाही होते. याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.