दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता दहावी – बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रस्तावाला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मंजुरी देणार का ? याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
मागील दोन वर्षांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्या असं मत राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत व्यक्त केलं. या बैठकीला शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुलांचा लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे त्यामुळे देखील विद्यार्थी संभ्रमात आहेत. म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्या आहे.
बच्चू कडू यांनी अशा सुचना दिल्याने दहावी – बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. या संदर्भात परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शिक्षण मंडळाचा प्रस्ताव सचिवांकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मंजुरी देणार का? की ठरलेल्या वेळेत परीक्षा होणार आहे ? त्यामुळे आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.