राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रादुर्भाव आणि तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज करता येणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
येत्या 15 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. कोरोनाकाळात दहावीच्या परीक्षा दोन वर्षे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत, दोन वर्षे विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते. बारावीची परीक्षा येत्या 4 मार्चपासून सुरू होणार आहे. यात उशीरा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी विलंब शुल्क भरावे लागत होते, मात्र आता विलंब शुल्कही सरकारकडून माफ करण्यात आले आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून नियमीत शुल्क घेतले जाणार आहे. याबाबत सविस्तर लेखी आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढले आहेत.
मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, गेल्या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १३ लाख १९ हजार ७५४ होती ती या वर्षी संख्या वाढून १४ लाख ३१ हजार ७६७ झाली आहे. शिक्षण शास्त्र या विषयाला परवानगी दिली आहे. कारण विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्यांचे कुठेही नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
विलंब शुल्क आकारले जाऊ नये
विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेले आहेत. सगळ्यांचे म्हणणे आहे की, विलंब शुल्क आकारले जाऊ नये यासाठी बोर्डाशी चर्चा केली आहे. परीक्षासंदर्भात सर्व निर्णय बोर्ड घेत असते त्यांच्याशी शासन म्हणून आम्ही चर्चा करत असतो निर्णय बोर्ड घेत असते. अर्जाला विलंब झाल्यास त्याचे शुल्क घेऊ नये यासाठी बोर्डाशी चर्चा केली आहे. बोर्डकडून कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.