एकीकडे आजपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक झाला असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशात सर्वाधिक म्युकरमायकोसिसचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे राज्यसरकारसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
देशातील २८ राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) चे एकूण २८,२५२ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ८६ टक्के म्हणजेच २४३७ प्रकरणांमध्ये कोरोना संक्रमणाचा इतिहास आहे. तसेच १७,६०१ मधुमेह असलेले रुग्ण आहेत. महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक ६,३३९ रुग्ण आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये ५,४८६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
आज कोरोना संदर्भात उच्चस्तरीय मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन होते. या बैठकीत डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना परिस्थिती व त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करून सांगितले की, "रिकवरी दर वाढत आहे आणि आज तो ९३.९४ टक्के आहे. आज गेल्या २४ तासांत, गेल्या ६१ दिवसांत सर्वात कमी नवीन रुग्ण आढळले. आज केवळ १,००,६३६ बाधित आढळले. तसेच या २४ तासांत १,७४,३९९ रूग्ण बरे झाले आहेत. देशातील कोविडमधील मृत्यूचे प्रमाण १.२० आहे.