देशात थंडीचा कडाका मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. यात जम्मू-काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. दरम्यान 14 जानेवारीपर्यंत पूर्व आणि लगतच्या मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी दिला आहे. त्याच वेळी, पुढील 4-5 दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके आणि थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भाग थंडीची लाट आणि धुक्याच्या विळख्यात राहणार असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस अलवर, भरतपूर, झुंझुनू, सीकर, बिकानेर, चुरू, हनुमानगढ, गंगानगर आणि नागौर आदी जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि धुक्याचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्रात थंडी वाढू शकते. येत्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 12- 15 जानेवारीला आणि उत्तर राजस्थानमध्ये 11-13 जानेवारीला थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवसांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पुढील तीन दिवसांत राजस्थानमध्ये धुके किंवा खूप दाट धुके पडू शकते.