प्रशांत जगताप, सातारा | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोजताई पाटील यांची निवड झाली आहे. समितीची राज्य कार्यकारी समिती, सल्लागार समिती, सर्व राज्य विभागाचे सदस्य या सर्वांच्या सोमवारी झालेल्या ऑनलाईन राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये एकमताने सरोजताईंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या नावास महाराष्ट्र अंनिसच्या विश्वस्त मंडळाने ही मान्यता दिली आहे.
समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून सरोजताईंचे यांचे नाव सुचविण्यात आले. सरोजताईंनी ही जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. सत्यशोधक चळवळीचा विचार मानणाऱ्या कुटुंबात सरोजताईंचा जन्म झाला. सत्यशोधक परंपरेतील विवेकवादी विचार उचलून धरणारे एन. डी. पाटील त्यांना पति म्हणून लाभले. समिती सोबत त्या संघटनेच्या स्थापनेपासून कृतिशील पणे जोडल्या गेलेल्या आहेत. अंनिस संघटनेतील कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी त्यांचे वैचारिक नाते आहे. सरोजताई रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळच्याही सदस्य आहेत.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सरोजताई पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली, माझ्यावर विश्वास ठेवून मला अध्यक्षपद दिले त्याचा मी स्वीकार करते असे सांगत प्रामाणिकपणे मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करेन असे आश्वासन दिले.