अंबरनाथ शहरातील मोरीवली डम्पिंग ग्राउंडवर अज्ञातांनी लॉलीपॉप टाकले आहेत. त्यामुळे डम्पिंगवर अक्षरश: लॉलीपॉपचा खच पडला असून लॉलीपॉप उचलण्यासाठी कचरा वेचक मुलांनी गर्दी केली आहे. अंबरनाथ शहरालगत मोरीवली पाड्याजवळ डम्पिंग ग्राउंड आहे. हे डम्पिंग ग्राउंड काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले आहे.
मात्र तरीही एमआयडीसी भागातील काही कंपन्या, तसंच काही हॉटेलचालक आपला कचरा अजूनही याच बंद डम्पिंगवर आणून टाकतात. त्यामुळे कंपनीच्या बाहेरच्या बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण पडलेली दिसते. त्यातच डम्पिंगवर दोन दिवसांपासून लॉलीपॉपच्या गोण्या आणून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडवर लॉलीपॉपचा अक्षरशः खच पडला आहे. अंबरनाथ एमआयडीसीत चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे यांच्या अनेक कंपन्या आहेत.
त्यांच्यातीलच एखाद्या कंपनीने हे लॉलीपॉप या ठिकाणी आणून टाकले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र हे लॉलीपॉप ज्याअर्थी कचऱ्यात आणून टाकण्यात आले आहेत, त्याअर्थी ते खराब असावेत, किंवा एक्सपायरी डेट झालेले असावेत, अशी शक्यता आहे. त्यामुळे लॉलीपॉप उचलून खाणाऱ्या कचरावेचक मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे हे लॉलीपॉप इथे कुणी आणि का टाकले? याचा तपास होणे गरजेचे आहे. यामुळे आरोग्यास धोका होऊ शकतो.