यंदा आषाढी एकादशी येत्या 17 जुलै 2024 ला साजरी होणार आहे. हिंदू पंचागानुसार आषाढी एकादशीचा तिथी 16 जुलै रोजी रात्री 08:33 वाजता सुरू झाला आहे. या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. उपवास केला जातो. आषाढी एकादशीची तिथी हिंदू धर्मांमध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विठ्ठल भक्त विठूरायाच्या चरणी लीन होतात.
"आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला 'आषाढी एकादशी' असे म्हणतात. ही एकादशी 'देवशयनी एकादशी' म्हणूनही ओळखली जाते. यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी आहे. या दिवसापासून सर्व प्रकारची शुभ कार्ये, विवाह थांबतील आणि चातुर्मासही या दिवसापासून सुरू होईल."
आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो. सकाळी उठल्यावर स्नान करुन घरातील देवाची पूजा करा. त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. आता स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा. विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. विठुरायाची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नयेत. पण आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करावी.
आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त हा पहाटे 5 वाजल्यापासून ते सांयकाळी 4 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुम्ही विठूरायाची आणि भगवान विष्णूची पूजा करू शकता. आषाढी एकादशीनिमित्त अनेक भक्त पारायण करतात. हे पारायण करण्यासाठी शुभ मुहूर्त हा पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सूरू होणार आहे आणि तो 8 वाजून 20 मिनिटांनी समाप्त होईल.