मुंबईसह नवी मुंबई, ठाणे या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील अटगाव फिडरची लाईट गेल्याने साधारण 35 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका वायरमॅनने जीवाची पर्वा न करता पाण्यात जाऊन पोलवरील तुटलेली हायटेन्शनची तार जोडली. त्यामुळे 35 गावांचा वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरु झाला. श्रावण शेलवले असे या वायरमॅनचे नाव असून सध्या त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित
वीज दुरुस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कानविंदे या गावालगत एक तलाव आहे. या तलावात वीजेचा पोल आहे. या पोलवर लाईटचा कंडक्टर तुटला आहे. त्यामुळे अटगाव फिडरवर चालू आलेल्या 30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती श्रावण शेलवले यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली.
भर पावसात पोहत जाऊन तार जोडणी
ही माहिती मिळाल्यानंतर श्रावण यांनी भर पावसात सुरक्षेसाठी कोणतेही साहित्य नसताना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता थेट तलावात उडी मारली. जनतेची सेवा करण्यासाठी वायरमॅन श्रावण यांनी हातातले हँडग्लोव्हज आणि पक्कड या गोष्टी तोंडात पकडल्या.त्यानंतर पुढे पाण्यात पोहत जाऊन पोलवर चढून तुटलेली तार जोडली. यामुळे 35 गावांचा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत फोडसे नावाचे आणखी एक वायरमॅन उपस्थितीत होते.
श्रावण शेलवले आणि फोडसे या दोघांच्या या कामगिरीमुळे 35 गावांचा वीज पुरवठा पूर्ववत होण्यास मदत मिळाली आहे. या महावितरणच्या दोन्ही जनसेवकांचे शहापूर तालुक्यात कौतुक केले जात आहे.