१५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याची घोषणा झाली. २०० वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजानी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाइसरॉय असतील असं ठरलं होतं. ब्रिटीश संसदेनं त्यांना ३० जून १९४८ पर्यंत भारताची सत्ता भारतातील लोकांना हस्तांतरित करण्याचा वेळ दिला होता.
लॉर्ड माऊंटबॅटन यांनी याच तारखेची निवड केली कारण, जपाननं मित्र राष्ट्रांच्या फौजांसमोर शरणागती पत्करली त्या गोष्टीला या दिवशी दोन वर्ष पूर्ण होत होती. तर माऊंटबॅटन यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांना सांगितलं होतं की, भारतातली परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर चालली होती. त्यामुळे ब्रिटिशांना लवकरात लवकर या देशातून बाहेर पडायचंच होतं.
ब्रिटिशांनी १९४८ साली भारताला स्वातंत्र्य देण्याचं मान्य केलं होतं. महात्मा गांधी यांचं 'भारत छोडो' आंदोलन, गांधी आणि जिना यांच्यातील वाद यामुळं माऊंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतरणाचा दबाव वाढू लागला होता. त्यामुळं त्यांनी आणखी एक वर्ष वाट पाहण्याऐवजी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य बहाल केलं आणि तो दिवस होता १५ ऑगस्ट.