भारतीय नागरी सेवेतील अधिकारी देशातील प्रशासकीय व्यवस्था संभाळण्याचे महत्वाचे काम करतात. त्यामुळे प्रशासनाची धुरा या अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. भारतीय नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना देशात महत्वाचे स्थान आहे. त्यांचे महत्व अधोरेखित करुन नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या अधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी 21 एप्रिलला भारतात राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा करण्यात येतो.
देशाची प्रशासकीय धुरा संभाळण्याचे महत्वाचे काम प्रशासकीय अधिकारी करतात. नागरिकांची सेवा करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा सेवेत योग्य तो सन्मान राखण्यासाठी राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा करण्यात येतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे तत्कालिन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 21 एप्रिल 1947 ला पहिल्यांदा दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला संबोधित केले होते. गृहमंत्र्यांनी पहिल्या तुकडीतील अधिकाऱ्यांना संबोधित केलेल्या या दिवसाची आठवण म्हणून भारत सरकारने 2006 पासून 21 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. तेव्हापासून 21 एप्रील हा दिवस भारतात राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय नागरी सेवेत काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सेवेवर जनतेचा मोठा विश्वास असतो. नागरिकांना सरकारकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवांची अंमलबजावणी करण्याचे महत्वाचे काम प्रशासकीय अधिकारी करतात. त्यासह देशात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कामही प्रशासकीय अधिकाऱ्यांना करावे लागते. त्यामुळे नागरी सेवेतील अधिकारी हेच नागरिकांशी प्रत्यक्ष जोडलेले असल्याने त्यांचे महत्व नागरिकांच्या दृष्टीने खूप मोठे असते. त्यामुळे राष्ट्रीय नागरी सेवा दिनाला महत्व प्राप्त होते.