कृषी आंदोलनानंतर आता देशात ट्रक चालकांचे आंदोलन चांगलेच चर्चेत येत आहेत. हिट अॅण्ड रन कायद्यात बदल केल्यामुळे ट्रक चालकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. देशभरात वाहतूक संघटना आणि वाहन चालक मोठ्या प्रमाणात आंदोलने आणि निदर्शने करत होते. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत दिसले. मात्र, दुसरीकडे या ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे सामन्यांना अनेक समस्यांशी सामना करावा लागला. परंतु, हे आंदोलन कशासाठी आणि का केलं होतं हे अद्याप काही लोकांना माहिती नाही. तर जाणून घेऊ नेमकं आंदोलन का केलं होतं?
केंद्र सरकारने हिट अॅण्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. हा कायदा ड्रायव्हरांच्या हिताचा नाही असं वाहन चालकांचे म्हणणं आहे. आतापर्यंत कायद्यात हिट अॅण्ड रन केसमध्ये 2 वर्ष शिक्षेची तरतूद होती. जामीन मिळून जायचा. पण आता कायद्यात बदल झाला आहे. कायद्यातील बदलानुसार, जर एखाद्या चालकाकडून अपघात झाल्यास चालकाने मदत न करताच, पोलिसांना माहिती न देताच पळ काढला तर त्या चालकास १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे चालकांनी देखील हा विरोध नक्की कशासाठी हे देखील सांगितलं आहे. ड्रायव्हर्स असं म्हणतायत की अनेकदा चूक नसूनही आम्हाला पळून जावं लागतं, कारण अपघातानंतर जमलेल्या जमावाकडून मारहाणीची भीती असते. चूक कुणाची हे शोधण्यासाठी यंत्रणा नाही. अनेकदा मोठ्या वाहनांचीच चूक दाखवली जाते. त्यामुळे हा कायदा ड्रायव्हरांच्या हिताचा नाही. म्हणून चालकांचा या कायद्याला विरोध आहे. त्यामुळे देशभरात या कायद्याविरोधात आंदोलन होत होती.
केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक झाली त्यात हिट अॅण्ड रनचा कायदा लागू झालेला नाहीय, असं म्हणले आणि ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. आता हे आंदोलन मागे घेतलं आहे, पण या कायद्यासंबंधी सरकारने अजून काही निर्णय घेतला नाही.