पावसाळ्यात येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते. महाराष्ट्रात हा सण महिला उत्साहात साजरा करतात. यावर्षी दिवसभरात महिला कधीही वडाची पूजा करू शकता.
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साहित्य
वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, अगरबत्ती, तूप, हळद-कुंकू, तर केळी, संत्री, सफरचंद, मोसंबी, चिकू अशी पाच प्रकारची फळे, फुले, दिवा ठेवण्यासाठी एक वस्तू, पाणी भरलेला एक कलश, लहान हिरव्या बांगड्या, तसेच तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून पंचामृत तयार करावे.
वटपौर्णिमेचे व्रत
सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथेच सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असा समज आहे. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. तीन दिवसांचे हे व्रत सध्या केवळ वटपौर्णिमेच्या एका दिवशीच करतात. महिला या दिवशी सजूनधजून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात.
घरीच साजरी करा वटपौर्णिमा
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घरात राहूनच पूजा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. बाहेर जाऊन पूजा करण्यापेक्षा मनोभावे तुम्ही घरच्या घरी उपवास करून देवाकडे प्रार्थना करावी. वडाची फांदी घरी आणून पूजा करू शकता. आजही आधुनिक महिलाही संपूर्ण रूढी परंपरा जपत ही वडाची पूजा पूर्ण करतात. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री हा उपवास सोडावा.