खगोलशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असे 2023 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज आहे. हे ग्रहण 28-29 ऑक्टोबरच्या रात्री 01:05 पासून सुरू होईल आणि 02:23 पर्यंत चालेल. रात्री उशिरा होणारे चंद्रग्रहण भारतासह बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूतान, इंडोनेशिया, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, हिंद महासागर, प्रशांत महासागर आणि इतर ठिकाणीही दिसणार आहे. भारतात मध्यरात्रीनंतर दिल्ली, मुंबई, चेन्नई, जयपूर, कानपूर, लखनौ, नागपूर, कोईम्बतूर, नाशिक, रायपूर, भोपाळ, जोधपूर, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, सूरत, प्रयागराज, डेहराडून आणि पाटणा यासह भारतातील इतर भागात चंद्रग्रहण दिसेल.
28 ऑक्टोबरला मध्यरात्री शरद पौर्णिमेला चंद्र मेष राशीत दिसेल. चंद्रग्रहणाची सुरुवात 11:31 वाजता छायाकल्प चंद्रग्रहणाने सुरू होईल. 1:05 मिनिटाने खंडग्रास ग्रहण सुरुवात होईल. 1:44 ला सर्वाधिक ग्रहण दिसेल. यावेळी चंद्र 10 ते 12 टक्के ग्रस्तोदित असेल. 2:22 मिनिटाने खंडग्रास ग्रहण संपेल. परंतु साध्या डोळ्याने न दिसणारे छायाकल्प चंद्रग्रहण 3:56 वाजता संपेल. संपूर्ण ग्रहणाचा काळ 4:25 तासांचा तर खंडग्रास ग्रहण 1:18तासाचे असेल. यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी झाले होते. हे या वर्षांतील शेवटचे ग्रहण असेल.
कोजागिरी पौर्णिमेवर ग्रहणाचे सावट
शनिवार 28ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 पासून रविवारी 29 च्या पहाटे 2:23 वाजेपर्यंत नागपूर विभागात खंडग्रास चंद्रग्रहणाचे वेध लागत आहेत. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त करावयाची पूजा, दुधाचा नैवेद्य इत्यादी ग्रहण लागण्यापूर्वी करता येईल.
चंद्रग्रहण पाहण्यासाठी विविध प्रकारच्या खगोलीय दुर्बिणींचा वापर केला जातो. चंद्रग्रहण पाहण्याने कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. उघड्या डोळ्यांनीही ते पाहता येते. विज्ञानानुसार चंद्रग्रहण पाहिल्याने डोळ्यांवर कोणताही परिणाम होत नाही. चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपण अनेक ठिकाणी दुर्बिणीद्वारे लोकांना दाखवले जाणार आहे. याशिवाय TimeandDate.com या वेबसाईटवर आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही चंद्रग्रहण लाईव्ह पाहू शकता. याशिवाय 'Royal Observatory Greenwich'च्या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही हे चंद्रग्रहण लाईव्ह पाहू शकता.
आज होणारे हे ग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतातही प्रभावी ठरेल. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुतक कालावधी सुरू होईल आणि ग्रहण संपल्यानंतरच संपेल. सुतक काळात शुभ आणि शुभ कार्ये वर्ज्य आहेत. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा केली जात नाही.