लोकशाही स्पेशल

Shivrajyabhishek Din 2021 | भारतीय इतिहासाचं सुवर्णपान ‘शिवराज्याभिषेक’

Published by : Lokshahi News

भारताच्या इतिहासात श्री छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या आणि दिल्लीपर्यंतही आपल्या कर्तृत्त्वानं शत्रूला थरथर कापायला भाग पाडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया किती थोर हे सर्वांनाच ज्ञात. महाराजांची कारकिर्द ही प्रत्येकाला हेवा वाटेल आणि उर अभिमानानं भरुन येईल अशी. अशाच या कारकिर्दीतील, जीवनप्रवासातील एक दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.

यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जूनला किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्‍वराज्‍याची राजधानी रायगड किल्ल्यावरून 6 जून 1674 या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्‍यामुळे हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणून ओळखला जातो. याच खास दिवसाचं औचित्य साधत सुमारे 350 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'सुवर्ण होनांनी' अभिषेक करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'होन' सुपूर्द होणं हा एक सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

या पार्श्वभूमीवरच महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला होता? महाराजांनी रायगडालाच का राजधानीचा दर्जा दिला होता? याविषयी माहिती जाणून घेऊयात.

असा पार पडला होता शिवराज्याभिषेक :
प्रत्यक्षात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन आपण ऐकले तर तो एक दैदिप्यमान सोहळा होता. यात राजांचा अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले. हे दोन मुख्य विधी पार पडल्यानंतर महाराज छत्रपती झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. त्यानंतर महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांनी मंत्रोच्चारण करत शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा केला. त्यानंतर 32 मण सोन्याने सजवलेल्या भव्य सिंहासनावर महाराज आरुढ झाले.

महाराजांनी रायगडालाच का दिला राजधानीचा दर्जा?
शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायगडास वेढा घातला होता. पुढे एका महिन्‍यानंतर हा किल्‍ला महाराजांच्या ताब्यात आला. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला. त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणा-या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ