लोकशाही स्पेशल

Maharani Tarabai Punyatithi: स्वराज्याची सौदामिनी होत्या महाराणी ताराबाई; तब्बल 7 वर्षे दिली औरंगजेबाशी यशस्वी झुंज

कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, माहाराज राजाराम यांची धर्मपत्नी आणि हंबीरराव मोहिते यांची कन्या होती माहाराणी ताराबाई. १६८३-८४ च्या सुमारास ताराबाईचा विवाह महाराज राजाराम यांच्याशी झाला.

Published by : shweta walge

महाराष्ट्राचा गौरवशाली 'शिवइतिहास' घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने! सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासाठी साक्ष देतात. इतिहास नुसताच घडत गेला नाही, तर तो विविध पैलूंनी समृध्द होत गेला. इतिहास घडला तो घडला कर्त्या व्यक्तींच्या कर्तृत्वावर, त्यात कर्त्या स्त्रियांचा देखील सहभाग होता. अशीच एक कर्तबगार स्त्री होती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या संस्थापिका आणि शिवाजी महाराजांचे पुत्र महाराज राजाराम यांच्या धर्मपत्नी महाराणी ताराबाई. महाराज राजाराम आणि ताराबाई यांना आजच्या दिवशी ९ जून १६९६ पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यानिमित्ताने divaymarathi.com महाराणी ताराबाई यांच्या कार्याविषयी माहिती देत आहे.

कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, माहाराज राजाराम यांची धर्मपत्नी आणि हंबीरराव मोहिते यांची कन्या होती माहाराणी ताराबाई. १६८३-८४ च्या सुमारास ताराबाईचा विवाह महाराज राजाराम यांच्याशी झाला. स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आलेल्या मोगल सैन्यांनी रायगडास वेढा घातला तेव्हा ५ एप्रिल १६८९ रोजी जिंजीला जाण्यासाठी ताराबाईंनी महाराज राजाराम यांच्यासमवेत रायगड किल्ला सोडला. राजाराम जिंजीला गेले, तेव्हा ताराबाई रामचंद्र नीलकंठ यांच्या योजनेप्रमाणे मोगल सैन्याला चुकवीत विशालगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या. त्यानंतर रामचंद्रपंतांच्या सहवासात ताराबाईंनी मुलकी व लष्करी व्यवहाराचे शिक्षण घेतले. ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई १६९४ मध्ये जिंजीला पोहोचल्या. ९ जून १६९६ ला ताराबाईंनी जिंजी किल्यावर मुलाला जन्म दिला. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. २ मार्च १७०० रोजी महाराज राजाराम यांचा मृत्यू झाला. येथूनच महाराणी ताराबाई यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली.

छत्रपती संभाजीराजांची पत्नी म्हणजे मराठा राज्याची राणी आणि राजपुत्र (येसुबाई आणि शाहू) मुघलांचे कैदी बनले. मराठ्यांचे गडकोट, जंजिरे, प्रदेश भराभर मुघलांच्या हाती पडले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा राज्याचा अंत झाला असे काही वाटत असताना. या राज्याची धुरा महाराणी ताराबाई यांनी आपल्या हाती घेतली.

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली. घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला. अखेरीस अपयश घेऊन येथेच त्याच्या मृत्यू झाला. या काळात ताराबाई आणि शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच होता. १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी पराभूत केले. जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून ताराबाईंनी स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.

शाहू मोगलांच्या कैदेत असताना ताराबाईंनी आपला पुत्र शिवाजीचा विशाळगड येथे राज्यभिषेक करून त्याच्या नावाने राज्यकारभार पाहू लागल्या. त्यांनी सैन्याधिकाऱ्यांची नेमनूक करून औरंगजेबाला खुले आव्हान देत युद्ध सुरू केले. १७०५ मध्ये मराठ्यांनी पन्हाळा मोगलांकडून जिंकून घेतला. त्यानंतर ताराबाईने पन्हाळा ही मराठा राज्याची राजधानी केली. दक्षिणेतील मोगलांच्या सैन्याचे बळ कमी व्हावे, म्हणून त्यांनी उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली. १७०० ते १७०७ पर्यंत मोगलांनी घेतलेले बहुतेक गड ताराबाईंनी परत मिळवले.

औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले. ते तोतया नसून खरे शाहू आहे, याची खात्री ताराबाईने करून घेतली. त्यानंतर शिवाजी महाराजांचे खरे वारसदर आपणच आहोत असा दावा शाहू महाराजांकडून करण्यात येऊ लागला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड-कडूस येथे ताराबाई व शाहू महाराज यांच्यात लढाई झाली. ताराबाईच्या ताब्यात असलेले गड शाहू महाराजांनी मिळविले. ताराबाईंच्या पक्षातील योद्धे बाळाजी विश्वनाथ, चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, खटावकर यांच्यासारखे मातब्बर सरदार मंडळींना शाहू महाराजांनी आपल्या बाजूला वळवून घेतले. १७१४ मध्ये राजाराम यांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी आपला मुलगा संभाजीला पन्हाळा येथे छत्रपतीच्या गादीवर बसवून ताराबाई व तिचा मुलगा शिवाजी यांना अटक केली. ताराबाईचा मुलगा शिवाजीचा १७२७ मध्ये बंदिवासातच मृत्यू झाला. त्यानंतर पेशव्यांच्या मध्यस्थीने ताराबाई व शाहू यांची भेट झाली. तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना सन्मानाने वागवले. त्यानंतर ताराबाई सातारा येथे राहण्यासाठी गेल्या. १७४९ पर्यंत तिचे आणि शाहूचे संबंध चांगले राहिले.

आपला नातू रामराजा याला दत्तक घ्यावे म्हणून ताराबाईंनी शाहूचे मन वळविले. शाहूच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावाने रामराजाला साताऱ्याच्या गादीवर बसविले. त्याला आपल्या हातातले बाहुले करून सर्व सत्ता स्वतःच्या हाताने घेण्याचा ताराबाईंनी प्रयत्न केला. परंतु, रामराजा पेशव्यांच्या सल्ल्याने वागत आहेत, हे पहाताच त्यांनी तो खरा वारसदार नाही, असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला.

१७५० मध्ये साताऱ्यात असता ताराबाईंनी रामराजास कैदेत टाकले. दमाजी गायकवाड आणि नासिरजंग निजाम यांच्या साह्याने त्यांनी साताऱ्याचा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला. पेशव्यांनी ताराबाईशी गोडीगुलाबीने वागून रामराजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अखेर पेशव्यांनी ताराबाईना कैद करण्यासाठी सैन्य पाठवले आणि त्या पेशव्यांना शरण गेल्या. १७६० मध्ये संभाजीच्या मृत्यूमुळे पुन्हा वारसाहक्काचा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नाचा निर्णय लागण्यापूर्वी पानिपतमध्ये पेशव्यांचा पराभव (१७६१) झाला. हे ऐकल्यावर 'बरे झाले' असे पेशव्यांविषयी उद्गार काढून तारबाई मरण पावल्या.

ताराबाई हुशार, राजकारणी व कारस्थानी होत्या. आपल्या विरूद्ध पक्षातील माहिती काढण्यासाठी त्यांनी स्वतःचे हेर नेमले होते. राजारामाच्या वारसाहक्कासाठी भांडून कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली. शाही स्वराज्यात येण्यापूर्वी आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व केले आणि मोगलांशी टक्कर दिली.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती