प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास करतात. विष्णू देवाची पूजा करतात. एकादशीच्या दुसर्या दिवशी उपवास सोडला जातो. यंदा गुरुवार 07 मार्च 2024 रोजी भागवत एकादशी आहे.
एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो.
स्मार्त आणि भागवत एकादशी, असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद येतात. त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसर्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ एक याप्रमाणे दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते. पण भागवत एकादशीला नाव नसते.
वारकरी संप्रदाय भागवत एकादशी साजरी करतो. विष्णू देवाचे भक्त पण भागवत एकादशी साजरी करू शकतात. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते, असे सांगतात.