Guru Govind Singh Jayanti 2024 : शीख समाजाचे १० वे गुरू १७ जानेवारी २०२४ रोजी गुरू गोविंद सिंग यांची ३५७ वी जयंती साजरी होणार आहे. यादिवशी शीख धर्माचे समुदाय गुरूद्वारांमध्ये जाऊन प्रार्थना करतात. गुरू गोविंद सिंग यांची जयंती पंजाबमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करतात. गुरू गोविंद यांनी सामाजिक समतेचे समर्थन केले होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांची सेवा केली आणि सत्याच्या मार्गावर त्यांनी वाटचाल केली होती.
गुरू गोविंद सिंग यांचा जन्म बिहारच्या पाटणा शहरात झाला होता. त्यांचे वडिल गुरू तेग बहादूर शीख धर्माचे नववे गुरू होते. मुघल सम्राट औरंगजेबाने गुरू तेग बहादूर यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार न केल्यामुळे त्यांचा शिरच्छेद केला होता. गुरु गोविंद सिंग यांच्या आईचेदेखील तिथेच निधन झाले होते.
असं मानतात की जिथे गुरू गोविंद सिंग यांचा जन्म झाला होता, आज त्या ठिकाणाला आता तख्त श्री हरमंदर जी पटना साहिब म्हणून ओळखतात. १६७६ मध्ये वयाच्या नवव्या वर्षी गुरू गोविंद सिंग यांना शिख समुदायाचे दहावे गुरू म्हणून घोषित केले होते.
गुरू गोविंद सिंग यांनीही मुघल सम्राट औरंगजेबच्या विरोधात लढाई केली होती. गुरू गोविंद सिंग यांनी लोकांना धर्माच्या स्वातंत्र्यासाठी आणि लढण्यासाठी प्रेरित केले होते. गुरु गोविंद सिंग यांनी ७ ऑक्टोबर १७०८ रोजी महाराष्ट्रातील नांदेड शहरात अखेरचा श्वास घेतला. गुरु गोविंद सिंग यांना चार पुत्र होते. गुरु गोविंद सिंग साहिबजादा अजित सिंग, जुझार सिंग, जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांचे गुरु गोविंद सिंग यांच्याआधीच निधन झाले होते.
श्री गुरू गोविंद सिंह यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबचे संकलन आणि लिखाण केले. नांदेड शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेडला शिखांची काशी असे म्हटले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात.