कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. जिकडे तिकडे मोठ मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. अष्टविनायक म्हटले की मोरगाव-लेण्याद्री-पाली ही पश्चिम महाराष्ट्रातली ठिकाणं आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ. मोठी प्राचीन परंपरा लाभलेला हा प्रदेश. गणपतींच्या २१ महत्त्वाच्या ठिकाणांपकी बरीच ठिकाणे विदर्भात आहेत. त्याचबरोबर विदर्भातले अष्टविनायकसुद्धा खास बघण्याजोगे आहेत. त्यांच्याशीसुद्धा विविध कथा, दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत.
सिद्धिविनायक एकचक्रा
नागपूर-वर्धा रस्त्यावर वध्र्यापासून अंदाजे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुष्कर्णी आहे. ही पुष्कर्णी चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची काळ्या दगडाची एक मूर्ती सापडली होती. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे म्हणतात. या गणेशाच्या दर्शनाला परगावाहून अनेक लोक येतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे.रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अनेक स्थाने, अनेक गावे यांचा संबंध रामायण आणि महाभारताशी जोडला गेलेला आढळतो.
शमी विघ्नेश -आदासा
संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे अदोष क्षेत्र. या ठिकाणाची दुसरी कथा अशी की वालीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी विष्णूने वामनावतार घेतला होता. या कार्यात आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्याने शमी विघ्नेशाची आराधना केली व त्याच्या कृपेने बळीच्या यज्ञाचा विध्वंस केला. या प्रसंगानंतर वामनाने वक्रतुंड नावाने गणेशाची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. गणेशाच्या २१ स्थानांपकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. इथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो. अविवाहित लोकांची या गणेशाच्या उपासनेने लग्न जमतात असे मानले जाते.
सर्वतोभद्र गणपती – पौनी
वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या पौनी गावात असलेला हा गणपती, म्हणजे विदर्भातील अष्टविनायकांपकी एक आगळावेगळा गणपती म्हणायला हवा. इथे गणपतीची मूर्ती नसून त्याऐवजी मंदिरात एक उभा पाषाण आहे आणि त्याला पाच बाजूंनी पाच तोंडे आहेत. त्यामुळे याला सर्वतोभद्र गणपती, भद्रा गणपती, पंचानन, विघ्नराज अशा विविध नावांनी संबोधले जाते. याच्या सर्व बाजूंनी गणपतीची तोंडे असल्यामुळे कोणत्याही बाजूने याचे दर्शन घेता येते. सर्व दिशांनी किंवा सर्व बाजूंनी ज्याचे दर्शन घेता येते तो सर्वतोभद्र किंवा अशा मूर्तीला सर्वतोभद्र मूर्ती असे म्हटले जाते.
चिंतामणी गणेश -कळंब
भक्तांच्या सर्व चिंतांचे हरण करणारा चिंतामणी वसला आहे नागपूर-यवतमाळ मार्गावरील कळंब या गावी. प्रसिद्ध एकवीस गणपती क्षेत्रांपकी एक पीठ असलेले प्राचीन कदंबपूर म्हणजेच आजचे कळंब होय. इथले गणपती मंदिर काहीसे निराळे आहे. अंदाजे १५ फूट जमिनीखाली ही मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. त्यासाठी तीन जिने उतरून आपल्याला तिथे जावे लागते. मूर्तीवर खूप मोठय़ा प्रमाणात शेंदूर चíचलेला असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. जवळच एक चौकोनी पावनकुंड असून त्याचे पाणी औषधी असल्याचे सांगतात. कोणतेही त्वचारोग त्या पाण्याने दूर होतात, असे इथे सांगितले जाते. या ठिकाणी एक निसर्गनवल पाहायला मिळते. इथे जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. त्या पाण्याची पातळी वाढायला लागून या गाभाऱ्यात पाणी साठू लागते आणि गणेशमूर्तीच्या पायाला पाणी लागले की पुन्हा ते ओसरते. असा प्रसंग बारा वर्षांतून एकदा घडतो.
भृशुंड गणपती – मेंढा भंडारा
प्राचीन स्थंडिलग्राम नावाने प्रसिद्ध असलेल्या मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या तीरावर विदर्भातील अष्टविनायकांपकी हा गणपती वसलेला आहे. भंडारा या जिल्हय़ाच्या ठिकाणाचे एक उपनगर असलेला हा भाग. या गणपतीला भृशुंडगणपती हे नाव कसे मिळाले याबद्दल एक सुंदर कथा आपल्याला गणेशपुराणात मिळते. नामा कोळी लोकांना त्रास देत असे. तो या परिसरात वाटमारी करीत असे. एकदा तो गणेशतीर्थ या ठिकाणी अंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते तोंडाने गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो आता वार करणार एवढय़ात ती तलवार गळून जमिनीवर पडली. नामा कोळ्याला पश्चात्ताप झाला आणि आपली पापे धुण्यासाठी काय करावे याची याचना त्याने मुदगल ऋषींकडे केली. मुदगल ऋषींनी त्याला सांगितले की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नम: असा जप सुरू करावा. तसेच त्यांनी एक वाळकी काठी दिली आणि तिला रोज पाणी घालायला सांगितले. जेव्हा त्या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईन, असे आश्वासन मुद्गल ऋषींनी दिले. नामा आता मंत्राचा जप करू लागला. अनेक वष्रे अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथे परत आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भलामोठा वृक्ष आणि एक मुंग्यांचे वारूळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नम: असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारूळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामा कोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेशसाधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती. मुदगल ऋषींनी त्याचे तप आणि त्याची सोंड पाहून त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले. मंदिरातील गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची मोठी भव्य असून ती सव्यललितासनात बसलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो.
अठरा हातांचा गणपती-रामटेक
अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच म्हणायला पाहिजे. पापधुपेश्वर तीर्थाकडे जाताना वाटेत गवळीपुरा इथे हे मंदिर वसले आहे. अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची आहे. देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत. पकी एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे स्थानिक सांगतात. तर अठरा सिद्धींमुळे या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात, असे पुराणात सांगितले आहे. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हटले जाते. या प्राचीन मंदिराचा आता जीर्णोद्धार केलेला असल्यामुळे नवीन बांधकाम केलेले मंदिर आपल्याला दिसते. अठरा हातांची ही मूर्ती इथून जवळच असलेल्या रामसागर खडशी तलावात रघुजी भोसल्यांच्या काळात सापडली, असे इथे सांगितले जाते. मंदिरात महागणपती आणि त्यांच्या बाजूला रिद्धी-सिद्धींच्या मूर्ती आहेत. तसेच देवी महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा मंदिरात पाहायला मिळते
वरदविनायक- टेकडी गणपती नागपूर
विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती. ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान. िपपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरचíचत प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते.
वरदविनायक गौराळा-भद्रावती
गणपती मंदिराला १६ खांब असलेला भव्य सभामंडप आहे. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. मुख्य गाभारा काहीसा खालच्या पातळीत असल्यामुळे काही पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. आत अंदाजे आठ फूट उंचीची गणेशाची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत दिसतो. देवाला दोनच हात असून दोनही हातात मोदकपात्र दिसते. गणपतीच्या पोटात काही धन असेल असे वाटल्यामुळे काही चोरांनी त्याची नासधूस केली होती. आता ते पूर्ववत केलेले आहे. गणपतीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट कोरलेला दिसतो.