दिवाळी हा सगळ्यांच्याच आवडीचा सण. दिवाळी म्हटल की रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, सजावट आणि खमंग फराळ हे सगळेच आले. मात्र याबरोबरच दिवाळीत अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व असते. यामुळे या दिवशी मन प्रसन्न करणारं सुगंधी उटणे लावून अंघोळ केली जाते. पहाटे उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. नरकचतुर्दशीच्या दिवशीही पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केला जातो. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. केवळ दिवाळीला नव्हे तर अभ्यंगस्नान विविध प्रसंगी केले जाते.
काय आहे आख्यायिका…?
नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. नरकासूर एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे.
अभ्यंगस्नान हे पौराणिक कथेशी जोडले गेलेले असल्याने त्याच्यासाठी काही विशिष्ट वेळ पाळण्याचे संकेत रूढ आहेत. याला मुहूर्त असे म्हटले जाते. या मुहूर्तावर केलेले अभ्यंगस्नान फलदायी होते, अशी मान्यता आहे.
चेहरा आणि शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते. आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात. तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्याना बळकटी देण्यासाठी उपयुक्त असते. उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडे पडत असलेली त्वचा मऊ राहते.
महाराष्ट्रात तिळाचे तेल, केरळात खोबरेल तेल तर उत्तर भारतात मोहरीचे तेल अंगाला लावून अभ्यंग केले जाते. यानंतर अंगाला जे उटणे लावले जाते त्यामध्ये नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद,मसूर डाळ, जटामासी, वाळा या आयुर्वेदाच्या औषधी चुर्णांचे मिश्रण केलेले असते. याचे लेपन अंगाला करून स्नान केले जाते.
पण बाजारात मिळणाऱ्या या उटण्यांमध्येही बऱ्याचदा काही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो. ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता ही असते. अशा वेळी त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी घरच्या घरीच तयार केलेले उटण्यांचा वापर केला तर? आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने उटणे कसे तयार करता येतील याची कृती.
उटण्यालासाठी लागणारं साहित्य –
250 ग्रॅम मसूर डाळीचे पीठ
25 ग्रॅम नागर मोथा
25 ग्रॅम आवळकाठी
25 ग्रॅम जेष्टमध
25 ग्रॅम वाळा
25 ग्रॅम तुळशी पावडर
25 ग्रॅम सुगंधी कचोरा
5 ग्रॅम आंबेहळद
25 ग्रॅम मंजीस्ट
25 ग्रॅम सरीवा
5 ग्रॅम कापूर
उटणे लावताना त्यात दूध आणि गुलाबजल घालावं. उटनं स्क्रबच काम करते. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन स्वच्छ होते. काळवंडलेला चेहरा उजळतो.