छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाचं एक पुढचं पाऊल. एकाएकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला होता. जनता आपलं काय होणार या चिंतेत असतानाच संभाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून जनतेचा हरवलेला आधार परत आणण्याचे काम केले. संभाजी महाराजांनी १६ जानेवारी १६८१ रोजी आपला राज्याभिषेक केला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही तशीच राहील, अशी हमी त्यांनी जनतेला दिली.राज्याभिषेकाप्रसंगी कैदयांना मुक्त करण्याचा रिवाज होता. त्या रिवाजाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी कैदयांना मुक्त करत मंत्रीमंडाळात स्थान नेमून त्यांना कारभाराची जबाबदारी सोपवली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या या मंगल प्रसंगी स्वतःच्या नावाची नाणे पाडली ज्यावर पुढच्या बाजुवर 'श्री राजा शंभूछत्रपती' तर मागच्या बाजुवर 'छत्रपती' अस अक्षरं कोरलेली पाहायला मिळतात. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच बुन्हाणपुरवर छापा टाकुन त्यांनी १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली. तसेच पुढील आठ वर्षात शिवरायांच्या स्वराज्यात दुप्पटीने वाढ, सैन्य आणि खजिन्यालही तिपटीने वाढ झाल्याचा उल्लेख आहे. मात्र या नव्या दमाच्या सेनानीच्या नेतृत्वाखाली मोहीम फत्ते करण्यासाठी जुने जाणते सरदारही उत्साही असंत, इतकी छाप छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कुशल युद्धकौशल्याने पाडली होती.
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौ रिव राजते |
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
सन १६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी अबे कॅरे म्हणतो,
“हा युवराज जरी लहान असला तरी धैर्यशील आहे. आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्यासोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला आहे. चांगल्या वयोवृद्ध सेनापतीही संभाजीमहाराजांशी बरोबरी करु शकणार नाहीत इतके ते तरबेज आहेत. छत्रपती संभाजी राजे मजबूत बांध्याचे असून अतिस्वरुपवान आहे. सैनिकांची त्यांच्यावर खास मर्जी आहे.ते त्यांना शिवरायांसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते.”
अशा या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मुजरा.