लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतात सध्या एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचे आंदोलन. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. अशातच बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरही मैदानात उतरले आहेत. मात्र ब़लिवूडमधील काही सिताऱ्यांचा पूर्वेतिहास पाहता, त्यांच्या सोशल मी़डियावरील पोस्टबद्दल संशय निर्माण होतो.
भारतातील 2019मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी एका वेबसाइटने स्टिंग ऑपरेशन केले होते. वेगवेगळ्या पक्षांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्याची ऑफर या वेबसाइटच्या अंडरकव्हर एजंटने दिली होती. त्यामध्ये 36 सेलिब्रिटी अडकले होते. लॉकडाऊनच्या वेळी सर्वाधिक कौतुक ज्याचे झाले, तो सोनू सूद देखील त्यात होता. त्याचे स्टिंग त्यावेळी व्हायरलही झाले होते.
आता पुन्हा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटिजनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर हा विषय देशांतर्गत असल्याची भूमिका अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासह इतर तारे-तारका तसेच काही क्रीडापटूंनी घेतली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर काही पोस्टही केल्या आहेत. विशेष म्हणजे, काही पोस्टचा मजकूर सारखाच आहे. त्यामुळे सोशल मीडिया हे या सेलिब्रिटिंच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे की, उत्पन्नाचा स्रोत? असा सवाल निर्माण झाला आहे.