भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज. यंदा भाऊबीजेचा सण आज 26 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. भाऊबीज हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा दिवाळीतला चौथा आणि शेवटचा दिवस असतो. भाऊबीज हा बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस.
पौराणिक कथेनुसार यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजच्या दिवशी यमराज दुपारी बहिणीच्या घरी आले आणि बहिणीची पूजा स्वीकारून तिच्या घरी जेवले असे मानले जाते. यानंतर वरदानात यमराजांनी यमुनेला यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी जो भाऊ बहिणींच्या घरी येईल आणि बहिणींची पूजा स्वीकारेल तसेच तिच्या हाताने तयार केलेले अन्न खाईल, त्यांना अकाली मृत्यूची भीती राहणार नाही असा आशिर्वाद दिला.यामुळेच यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज दुपारच्या वेळी साजरी करण्याला अधिक महत्त्व आहे.
भाऊबीज शुभ मुहूर्त आणि तिथी
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला साजरे केले जाते. भाऊबीज 26 ऑक्टोबर रोजी असणार आहे. मात्र, भाऊबीज तिथी 2 वाजून 42 मिनिटांपासून सुरु असणार आहे. त्यामुळे भाऊबीज साजरा करण्याची वेळ दुपारी 1:18 ते 3.33 पर्यंत असणार आहे.