शुभम शिंदे, मुंबई : बापाचं स्वप्न साकार करणं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. आणि प्रत्येक मुलगा बापाच्या स्वप्नासाठी धडपडत असतो. कारण बाप नावाची व्यक्ती एक अशी शक्ती आहे की ज्यानं रक्ताचं पाणी करून स्वतःच्या मुलाला घडवलेलं असतं, आणि मुलाच्या उज्वल भविष्यासाठी 'बाप' हा कितीही परिश्रम करायला तयार असतो. आपला मुलगा हा 'साहेब' व्हावा हे तर प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. बापाच्या स्वप्नाला न्याय देणं हे सगळ्याच मुलांना जमतं असं नाही पण ज्याला बापाच्या घामाची आणि केलेल्या परिश्रमांची जाणीव असते तो मुलगा बापाचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
बापाच्या स्वप्नांच्या पूर्ततेची जिद्द एक तरुण जेव्हा उराशी बाळगतो तेव्हा BAAP नावाच्या संकल्पनेचा जन्म होतो. हीच संकल्पना रुजवली जातेय अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील पारेगाव या खेडेगावात. बापाचं पोरगा साहेब होण्याचं स्वप्न ज्याने साकारलं आणि अशा अनेक बापाचं स्वप्न साकारण्यासाठी जो तरुण देवदूत बनला त्या तरुणाचं नाव रावसाहेब घुगे.
BAAP या स्वप्नाचा प्रवास
रावसाहेब घुगे या तरुणाचा प्रवास थक्क करणारा आहे. हा तरुण शिक्षण घेत असताना वडील शेतकरी असल्यामुळे घरात आर्थिक कमतरता होती. पण स्वप्न मोठी होती. या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास त्याने सोडला नाही. शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी त्याने अनेक बँकांशी संपर्क केला, मात्र तुमचे वडील नोकरीला नाहीत, शेती करतात सॅलरी स्लिप असल्याशिवाय कर्ज देऊ शकत नाही असं बँकांनी सांगितले तरीही हताश झालेल्या रावसाहेबने हार मानली नाही. अतिशय कठीण प्रसंगातून शिक्षण पूर्ण केलं. मात्र शिक्षण घेत असताना आपला बाप शेतकरी आहे म्हणून बँकांनी शैक्षणिक कर्ज नाकारल्याची खदखद या तरुणाच्या मनात होती. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर थेट अमेरिकेच्या नामांकित आयटी कंपनीत काम करण्याची संधी मिळाली आणि घुगे कुटुंबाची भरभराट झाली.
चांगल्या पगाराच्या नोकरीने आर्थिक परिस्थिती सुधारली सर्व आलबेल असताना हा तरुण मात्र गाव, माती आणि माणसांना विसरला नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला जो संघर्ष करावा लागला तो माझ्या गावखेड्यातल्या तरुण-तरुणींच्या वाट्याला येऊ नये म्हणून काहीतरी चिरंतर कार्य करण्याचं ध्येय रावसाहेब घुगेने ठरवले. आणि यातूनच बाप नावाच्या संकल्पनेचा जन्म झाला. आयटी कंपनीत काम मिळावे यासाठी ग्रामीण भागातील मुला-मुलींना शहरात गेल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, म्हणून स्वतःच्या गावात माळरानावर म्हणजेच संगमनेर तालुक्यातल्या पारेगाव खुर्द या खडकाळ माळरानावर बाप नावाची आयटी कंपनी रावसाहेब घुगेंनी सुरु केली. जे काही करायचं ते बापासाठी करायचं म्हणून कंपनीला नावही 'बाप' असे दिले. या नावात वडिलांप्रती कृतज्ञता आहेच आणि तांत्रिकदृष्ट्या देखील हे नाव BAAP - Business Applications And Platforms (बिझनेस ॲप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स) असे आहे.
कंपनीचे काम
बाप ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात काम करणार आहे. कारण आयटी क्षेत्रात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला कमालीचं महत्व आहे. यासोबतच ई-कॉमर्स, बँकिंग, ह्यूमन रिसोर्स यांसारख्या तीन ते चार डोमेनमध्ये काम करण्यात ही बाप कंपनी अग्रेसर आहे. विशेष म्हणजे यातील सर्व क्लायंट अमेरिकेतील आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर ही कंपनी कार्य करणार आहे.
गोष्ट शेतकरी बापाच्या टोपीची
संगमनेर तालुक्याच्या पारेगावातील माळरानावर भव्य अशी दिमाखात या कंपनीची इमारत उभी राहिलीय. एखाद्या स्मार्ट सिटीत आल्याचा अनुभव या कंपनीत आल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. या कंपनीचे प्रवेशद्वार उभारताना प्रवेशद्वारावर शेतकरी बापाच्या टोपीची प्रतिकृती रावसाहेब घुगेंनी लावलीय. ज्या बापाने संघर्ष केला त्या बापाचा सन्मान चक्क कंपनीच्या प्रवेशद्वारावर बापाच्या टोपीची प्रतिकृती आभारातून केलाय. ही गोष्ट लक्षवेधी आहे.
तरुणांच्या स्वप्नांचं आयटी हब
ग्रामीण भागातील मुलांमध्ये टॅलेंट असते मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही पर्यायी अनेकांचं स्वप्न विरून जाते. मात्र याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे टॅलेंट जगासमोर यावे यासाठी हा तरुण झटतोय. अनेक तरुणांना प्रयत्न करूनही आयटीत नोकरी मिळत नाही. आयटीचे संपूर्ण जाळे मोठ्या शहरांमध्ये असल्याने ग्रामीण भागातील तरुणांना लवकर संधी उपलब्ध होत नाही. यातून हुशार मुलांचं खच्चीकरण होतं. हे थांबवण्यासाठी आयटी क्षेत्रातील ठरावीक लोकांची सुरु असलेली मक्तेदारी मोडीत काढून पारेगाव खुर्द या 1200-1300 लोकसंख्या असलेल्या गावात तरुणांच्या स्वप्नांचं आयटी हब उभे राहिलेय. आपल्या माणसांसाठी काहीतरी करण्याची धडपड करून उभा राहिलेला बाप नावाचा प्रयोग नक्कीच राज्यासह देशाला प्रेरणा देणारा आहे.सावसाहेब घुगेंनी सुरु केलेल्या बाप नावाच्या कंपनीत पारेगावच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिले जाणार आहे. इयत्ता बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कंपनीत इंटर्नशिप अर्थातच तीन वर्षे योग्य प्रशिक्षण देऊन त्यानंतर याच कंपनीत नोकरीदेखील दिली जाणार आहे. त्यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांचे आयटी कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अकोले, संगमनेर, सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेकडो विद्यार्थी घुगे यांच्याशी जोडली गेलेत. पुढच्या चार वर्षात 600 मुलं-मुलींना नोकरी देण्याचा घुगेंचा मानस आहे.
स्वप्नांना मेहनतीची जोड असेल तर एक शेतकऱ्याचा पोरगा उत्तुंग भरारी घेऊन आपल्या मातीतल्या माणसांचं भविष्य उज्वल करू शकतो याचं उदाहरण म्हणजे रावसाहेब घुगे. त्यांचं कार्य तरुणांना प्रेरणादायी, महाराष्ट्राला दिशादर्शक, आणि देशात एक आदर्श निर्माण करणारं आहे. घुगेंचा हा प्रवास थक्क करणारा आहेच मात्र एका महान क्रांतीची सुरुवात आहे असं म्हटलं तरी अतिशोयोक्ती ठरणार नाही.