अमेरिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा रुपयावर परिणाम होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 84.17 पर्यंत खाली घसरली आहे. त्यामुळे आयात महागणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली, सातारा आणि पुणे दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांची 3 जिल्ह्यात तोफ धडाडणार असून आज त्यांच्या 4 जाहीर सभा होणार आहेत.
संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 20 डिसेंबरपर्यंत चालेल, असे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन सेंट्रल हॉलमध्ये साजरा केला जाईल. 'एक राष्ट्र, एक निवडणूक' प्रस्ताव आणि वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 वर जोरदार चर्चा होणार आहे. वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केले जाणार आहे.
महायुतीच्या प्रचारासाठी अमित शहा गुरुवार आणि शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा उद्या कोल्हापुरात मुक्कामाला येणार आहेत. शुक्रवारी इचलकरंजी, इस्लामपूर आणि जत आटपाडीच्या परिसरात अमित शहा यांच्या सभा होणार आहेत. भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली आहे.
भिवंडी ग्रामीणमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे आज विरोधकांचा काय समाचार घेणार याकडे भिवंडीवासीयांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले असून राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे.
बंडखोरी करणाऱ्यांची अखेर भाजपकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपमध्ये बंडखोरी केलेल्या 40 जणांवर पक्षाची कारवाई करण्यात आली असून पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील 53 मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे. 29 मतदान केंद्रांच्या जागेत बदल केला असून मतदारांमधील संभ्रम टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.
केज मतदार संघातील निवडणूक प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आज बावची, भालगाव, सादोळा, रामवडगाव, सोनेसांगवी , लोखंडी सावरगाव, श्रीपतरायवाडी, कोळकानडी व माकेगाव या गावांना भेटी देणार
ऑलिम्पिकसाठी भारताने एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतात ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 2036 मध्ये होणाऱ्या स्पर्धांच्या आयोजनासाठी 'आयओसी'ला पत्र पाठवण्यात आलं आहे.
विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र कायम आहे. गेल्या 24 वर्षांत 30 हजार 727 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतमालाचे घसरलेले दर, दुष्काळ, गारपीटीमुळे शेतकरी आत्महत्येत वाढ झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. महिनाभरात 96 वाहनांसह तीन कोटी 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी अयशस्वी असल्याचं कबूल केलं असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. अभिमन्यू वक्तव्यावरून कडूंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. प्रहारचे उमेदवार जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे मनसे उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरले असून अमरावती, लातूर, पंढरपूरमध्ये आज राज ठाकरेंची सभा होणार आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथांच्या विदर्भातील 3 मतदारसंघात प्रचारसभा होणार असून तिवसा,अकोला आणि वाशिम मतदारसंघात योगींच्या प्रचार जाहीर सभा होणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं अनावरण करण्यात येणार आहे.
राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा असणार आहे. राहुल गांधी महाविकास आघाडीकडून प्रचाराचे रणशिंग फुंकणार असून महाविकास आघाडीकडून आज लोककल्याणकारी घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.