शिवसेनेला (shivsena) डिवचण्याची एकही संधी भाजपाचे कोणताही नेता सोडत नाही… एमआयएमने (mim) महाविकास आघाडीला (mva) युतीचा प्रस्ताव दिल्याची बातमी येताच भाजपाला शिवसेनाविरोधात मोहिम चालवण्याची नामी संधी चालून आली… फडणवीस (phadnvis) यांनी शिवसेनेने आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या (balasaheb thackeray) ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे आणि अजानची स्पर्धा वैगरे चालली आहे. त्याचा परिणाम असल्याची बोचरी टिका केली.. फडणवीसांच्या टिकेनंतर भाजपाच्या अन्य नेत्यांनीही हिच रि ओढत शिवसेनेवर तोंडसुख घेत त्यांना अडचणीत आणण्याचे सर्वतोपरी राजकीय प्रयत्न केले… एमआयएमशी भविष्यात आघाडी केली तर त्यावर दोन्ही काँग्रेसला(congress) काही फरक पडणार नाही, मात्र शिवसेनेच्या विचारधारेशी त्यांचे जमणार नसल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसण्याचीच अधिक शक्यता आहे… राजकारणात काहीही अस्पृश्य नसतं आणि राहणारही नाही.. तरीही राजकीय चक्रव्यूह रचण्यासाठी अशा गोष्टींचा वापर होत असतोच… शिवेसेनेने त्यांच्या हिदुत्वाच्या मुद्याला बगल दिल्याचा आरोप सातत्याने भाजपाकडून केला जातोय… त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण शेंडी-जानव्यांचे हिंदुत्व करत नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे… त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना शिवसेनेने चहुबाजुंनी प्रत्युत्तर दिले… यावर शिवसेनेने 2021 साली काढलेल्या एका कॅलेंडरचा फोटो जाणिवपूर्वक प्रसिध्द केला… या कॅलेंडरमध्ये हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुखांचे नाव 'जनाब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' असा केला होता.. त्याआधी शिवसेनेच्या दक्षिण विभागाच्यावतीनं अजाण स्पर्धेचे आयोजन केल्याप्रकरणीही भाजपाने शिवेनेवर टिकेची झोड उठवली.. वास्तविक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून मुस्लिम धर्मियांविरोधात भाष्य केलंय तेवढे भाष्य भाजपाच्या एकाही नेत्यानं कधी केलं नाही… आपल्या देशातील सर्व पक्षात विविध जाती-धर्माचे लोक आहेत… तशा जातीच्या आणि समाजाच्या त्यांचे विभाग आहेत. शिवसेना मुस्लिम विरोधी असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक मुस्लिम नेते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत… साबीर शेख हे सेनेची सत्ता असताना मंत्रिपदावर होते… तसेच भाजपातही अनेक मुस्लिम नेते भाजपात बड्या पदावर आहेत. महाराष्ट्रात काँग्रेससोबत गेले म्हणून शिवसेनेवर टिका होते… पण भाजपाच जम्मू आणि काश्मिरमध्ये पीडीपीसोबत सत्तेत होता… त्यामुळे त्यांनीही कोण कोणासोबत गेले म्हणून आगपाखड करण्याची गरज नसते.. पण आरोप-प्रत्यारोप केले नाही तर राजकारणाला वेगही येणार नाही.. भाजपाने मविआ सरकारचे इफ्तार पार्ट्याचे फोटो सोशल मिडियावर वायरल करताच शिवसेनेनेही याच अस्त्राचा वापर करत भाजपा नेत्यांचे इफ्तार आणि दर्ग्यात चादर चढवतानाचे फोटो वायरल केले गेले.. खरंतर हा ज्याच्या त्याच्या आस्थेचा प्रश्न आहे.. पण आता सोशल मिडियामुळे असे फोटो वायरल करून त्याला जाती-धर्माची लेबल्स चिटकवली जातात… पक्ष कोणताही असो त्यांनी मतांच्या राजकारणांसाठी सर्व धर्मियांसोबत जावे लागते.. मात्र राजकीय कुरघोडीचा विषय आल्यावर त्यांच्यातील धर्माचा राक्षस जागा होतो, असंच म्हणावं लागेल… आपला देश सर्वधर्म-समभाव मानणारा आहे… आपल्या लोकशाहीत प्रत्येकाला त्यांच्या इच्छेनुसार जगण्याचा आणि अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे… शिवसेनेवर टिका करणारे भाजपा नेते कित्येकदा बिर्याणीवर ताव मारतानाचे फोटो आहेत… याचा अर्थ त्यांनी त्या धर्मासमोर लोटांगण घातले असे होत नाही.. तरीही अशा चर्चांना जाणिवपूर्वक हवा दिली जाते… विकासाच्या नावाखाली आपण कितीही प्रगल्भ होत असलो आणि स्वतःला पुरोगामी म्हणत असलो तरी राजकारणाचा विषय आल्यावर उगाचच आपण सर्वच धर्माचे आणि जातीचे लेबल लावतो… कोणताही विचार टोकाचा असू नये हे सत्य आहे… एखाद्याला त्यांच्या धर्माचे पालन करायचे असल्यास त्याला करू द्यावे पण ते त्यांनी दुसऱ्यावर कोणत्याही परिस्थितीत लादू नये… मात्र, आपल्याकडे अगदी याउलटचे राजकारण केले जाते… कोणाही दोन गटांमध्ये काही अघटीत झाल्यास त्यापैकी एक हिंदू आणि मुस्लिम असल्यास त्याला जातीयवादाचा रंग चढवला जातो… त्याचे पडसाद देशभर उमटतात. यात ज्यांचा काहीही संबंध नसतो अशीच मंडळी प्रामुख्याने भरडली जातात… मात्र राजकीय नेते नेमक्या याच घटनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात.. मतांच्या जोगव्यासाठी सर्वांनाच बर्याणीचा ठसका हवाहवासा असतो… मात्र कुरघोडीचे राजकारण करताना हिच बिर्याणी त्यांना नकोशी होते…
-नरेंद्र कोठेकर.