जस जसे आपले वय वाढत जाते तस तसा आपण अनुभव करितो की या संसारात सर्व काही उपलब्ध असताना देखील आपण सुखी आणि शांति पूर्ण जीवन व्यतीत करू शकत नाही. आपण सुख आणि शांति कशी प्राप्त करावी? या करिता प्रथम जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यात समाधानी असले पाहिजे. तसेच आपले लक्ष बाह्य जगतातून हटवून आपल्या अंतरी स्थिर करावे. कारण ज्या सुखाचा आणि शांतीचा आपण शोध घेत आहोत, ते कुठे बाहेर नसून आपल्या अंतरीच आहे. आपण ध्यान-अभ्यासा द्वारे याचे उत्तर शोधू शकतो. माणसाचा स्वभाव गुणच आहे की त्याच्यासमोर ज्या समस्या आणि आव्हाने येतात, त्यांचे तो निराकरण करतो.
गत हजारो वर्षापासून विकास होऊन सुद्धा, आपण सुख व शांती प्राप्त करू शकलो नाही. आपण अजून सुद्धा तणावपूर्ण जीवन जगत आहोत. ज्याच्यामुळे आपल्या समोर दररोज नवीन नवीन समस्या उभ्या राहतात. समस्या केवळ या युगातच नव्हे तर त्या मनुष्यजीवनच्या प्रारंभापासूनच आहेत. मनुष्य त्या समस्यांना आणि आव्हानांना तोंड देत आहे. प्रत्येक युगामध्ये लोकांनी जीवन साधे सरळ आणि चांगले बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या साठी आपण शांतिचा तसेच परम सुखाचा किंवा आत्मिक समाधानाचा मार्ग कोणता आहे याचा शोध घेत असतो आणि तो प्राप्त करण्याचा प्रयत्न देखील करतो.
जेव्हा आपण परम शांति आणि शाश्वत सुखाच्या बाबतीत विचार करतो, तेव्हा आपले लक्ष संत आणि महापुरुषांकडे जाते. जेव्हा आपण त्यांचे जीवन आणि शिकवणुकीकडे पाहतो, तेव्हा आपण विचार करतो, की काय आपण या युगात तशी शांति आणि सुख प्राप्त करू शकतो का, जे त्यांनी प्राप्त केले होते?
सर्व महापुरुष ज्यामध्ये संत आणि सुफी संत सम्मीलत आहेत, आपल्याला सांगतात की आपण सदैव टिकणारी शाश्वत शांती आणि सुख आपल्या अंतरीच प्राप्त करू शकतो. त्याकरिता ध्यान-अभ्यासाद्वारे आपल्या अंतरी असलेल्या परमेश्वराच्या ज्योती आणि श्रुतीशी जोडलो गेलो पाहिजे, परमेश्वराशी एकरूप झालो पाहिजे. सर्व संतांनी आपल्या आत्म्याचे परमेश्वराशी मिलन होण्याचा मार्ग समजावून सांगितला आहे. आपले शरीर आणि मन भलेही बाहेरील कामात लागलेले असो, परंतु त्यांनी आपले ध्यान परमेश्वराशी जोडून ठेवायचा उपाय सांगितला आहे. ते आपल्याला समजवतात की आपण आपला जास्तीत जास्त वेळ परमेश्वर प्राप्तीकडे लावावा. आपण असा प्रयत्न करावा की, परमेश्वराला ओळखून त्याच्याशी एकरूप व्हावे.