सुनील शेडोळकर
परराष्ट्र धोरण आणि राजकीय मुत्सद्दीपणा ही देशाला अनुकूल असे निर्णय घेतले तरच जगात आपल्या देशाची पत वाढण्यास मदत होते याची चुणूक इंदिरा गांधींनी बांगलादेश ला पाकिस्तान पासून वेगळं पाडून 1971 च्या युद्धात पाकिस्तान ला जोरदार उत्तर दिले होते. पाकिस्तान या शेजारी देशाच्या भारताबरोबरच्या या कुरबुरी स्वातंत्र्यापासून सुरू आहे. मुळात देशाची फाळणी ही धर्माच्या नावावर करून भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांत बेबनाव होत राहावा यांची पूर्ण व्यवस्था करुन ही ब्रिटिशांची दोन्ही देशांना दिलेली देणगीच समजली जाते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अतिलवचिक धोरणामुळे इतिहासात दोन मोठ्या चुका झाल्याचा आरोप काॅंग्रेस वर गेली 75 वर्षे विरोधी पक्ष करीत आला आहे. भारत स्वतंत्र होताना पंडित नेहरूंनी कणखरपणा न दाखविल्यामुळेच काश्मीरचा एक तृतीयांश भूभाग पाकिस्तान ने अनधिकृतरित्या बळकावला आहे. तर देऊ केलेले सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व चीनच्या घशात घातले. मुळात काश्मीर हे नंदनवन तर पाकिस्तान ने बळकावलेला पाकव्याप्त काश्मीर हे साक्षात पृथ्वीवरील स्वर्ग असल्याची अनुभूती अनेकांनी दिलेली आहे. 1947 पासून एक मोठा भूभाग भारताचा बळकावूनही पाकिस्तानची काश्मीर बाबतची भूमिका नेहमीच नकारात्मक राहिली आहे. काश्मीरचा मुद्दा गरज नसताना युनोमध्ये नेला गेला आणि त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची खामोशी पाकिस्तानच्या कुरापती वाढण्यास कारणीभूत ठरली होती. पाकव्याप्त काश्मीर मधून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग पाकिस्तान ने कित्येक वेळा केलेला आहे. पूर्व बांगलादेश हा फाळणीनंतर पाकिस्तानचा भाग होता, पण भारताविरुद्ध कुरापती काढून अशांतता पसरविण्याचे उद्योग याच भागातून पाकिस्तान ने नेहमीच केलेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर लाल बहादूर शास्त्री यांनी याचा बीमोड करण्याचा प्रयत्न केला, पण ताश्कंद करारावेळी घात झाला आणि शास्त्रींचे स्वप्न अपूर्ण राहिले.
मोहम्मद जिना यांच्यापासून प्रत्येक पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताविरोधातील काश्मीर राग आळवण्यात कोणतीही कसूर ठेवली गेली नाही. 1971 च्या भारत पाकिस्तान च्या युद्धाचे फलित बांगलादेशची निर्मिती करुन झाली. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी आपले परराष्ट्र धोरण आणि मुत्सद्देगिरीत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्याने स्वतंत्र बांगला देश निर्मितीची मागणी पूर्ण झाली. पाकिस्तान साठी हा मोठा धक्का होता. इंदिरा गांधींच्या या कणखर भूमिकेमुळे भारताची पोलादी भूमिका प्रथमच जगासमोर आली. या धक्क्यातून पाकिस्तान काही बोध घेऊन भारताबरोबर नवा व्यापार सुरू करुन आपल्या देशात सुखशांती नांदण्यासाठी प्रयत्न करेल अशी भारतासोबत आंतरराष्ट्रीय समुदायाची अपेक्षा पाकिस्तान ने फोल ठरवत आपली हेकेखोरी कायम ठेवून काश्मीरमधील अशांतता कशी वाढेल यासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. पाकिस्तान ने काश्मीर मध्ये अतिरेकी घुसवून जेवढे नुकसान करता येईल तेवढे केलेले आहे. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाल्यावर बेनझीर भुट्टो या पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या. दोन्ही शिक्षित पंतप्रधानांनी दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केला पण कट्टर धर्मवेड्या पाकिस्तानात सुधारणा करु पाहणाऱ्यांना कडवा विरोध केला जातो. बेनझीर भुट्टो यांची एका बाॅम्बस्फोटात हत्या झाल्यानंतर कट्टरवाद्यांनी काश्मीर अशांत ठेवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीर या पृथ्वीवरील स्वर्गाचे अतिरेक्यांचे अड्डे बनवून अक्षरशः खंडार केले. पाकिस्तान सोबत चांगले संबंध प्रस्थापित करावेत म्हणून प्रयत्न करणाऱ्या राजीव गांधी यांचे सरकार गेल्यानंतर 1989 मध्ये व्ही.पी. सिंग यांनी काश्मिरी नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांना देशाचे गृहमंत्री केले आणि काश्मीर मध्ये हाहाकार उडाला. आपल्याच राज्याचे नागरिक असलेल्या काश्मिरी पंडितांवर अमानुष अत्याचार काश्मीर मधूनच करण्यात आले. सुमारे 5 लाख कश्मिरी पंडितांना हुसकावण्यात आले. एरवी भारतात मुस्लिमांवरील झालेल्या अन्यायावर गदारोळ करणाऱ्या मानव अधिकार वाल्यांची काश्मिरी पंडितांवरील अमानुष अत्याचारावर बसलेली दातखिळी देशात फोफावणाऱ्या दुटप्पी राजकारणाची साक्षच होती.
1996 मध्ये अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाल्यावर पोखरण मध्ये अणुचाचणी घेऊन पाकिस्तान ला गर्भित इशारा देत भारताला अणुबॉम्ब सज्ज बनविले. पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजवट उलथवून लष्करी राजवटीने देश ताब्यात घेणाऱ्या परवेझ मुशर्रफ यांनीही पाठोपाठ अणुचाचणी घेऊन पाकिस्तान ही अणुबॉम्ब च्या बाबतीत मागे नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. आर्थिक पिछाडीवर असलेला पाकिस्तान या घटनेतून गेली 25 वर्षे अजूनही सावरलेला नाही. 1999 मध्ये कारगिल युद्ध पुकारून मुशर्रफ यांनी भारताकडून धोबीपछाड मिळवून पाकिस्तान मैत्री करण्यास कसा लायक नाही हे जगाला दाखवून दिले. 2014 साली नरेंद्र मोदी यांनी देशाची सुत्रे स्वीकारल्यांनंतरच वाजपेयी यांच्याप्रमाणेच नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहून भारत अजूनही पाकिस्तान बाबत आशादायी असल्याचे जगाला दाखवून दिले, पण ज्या प्रमाणे वाजपेयी यांना दिल्ली - लाहोर बस सुरू केल्यानंतर कारगिल मिळाले अगदी तशाच पद्धतीने नरेंद्र मोदींना उरीवरील हल्ल्याचे बक्षीस पाकिस्तान ने अतिरेक्यांकडून दिले त्याची सव्याज परतफेड नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक घडवून पाकिस्तानला 1971 नंतर पहिल्यांदाच गुडघ्यावर आणण्यात यश मिळाले. नरेंद्र मोदी यांना देशात त्यांचे विरोधक कितीही विरोध करोत, पण इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांच्यापेक्षाही भयंकर अशी पाकिस्तानवर जरब बसविण्याच्या मोदींच्या धाडसाने 2019 ची बक्षिसी भारतीय मतदारांनी मोदींना दिली हे नाकारून चालणार नाही. गेल्या वर्षी इंडोनेशियातील बाली येथील G 20 परिषदेत यंदाचे आयोजनपद भारताकडे आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाला पोहोचविण्याचे हे सर्वोत्तम माध्यम समजले जाते. नरेंद्र मोदी हे चालाख राजकारणी म्हणून ओळखले जातात. जगभरातून त्यांनी जनमत भारताच्या बाजूने वळविण्यात मोठी भूमिका बजावली आहे हे आॅगस्ट 2019 मधील त्यांच्या काश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे समर्थन भारताला मिळाले त्यामुळे काश्मीरमधील शांतता व पर्यटन पूर्वपदावर येण्यास मदत झालेली आहे. निसर्गाने भरभरून दिलेले काश्मीर सर्वार्थाने विकसित होण्यासाठी महत्वाची पावले टाकली जात आहेत. शिक्षणात पिछाडीवर पडलेल्या नंदनवनाला भारताच्या इतर विकसित भागांशी जोडून शिक्षणाची गंगा वाहाती करण्यासाठी आय आय टी व आय आय एम सारख्या संस्था आणि देशातील मान्यवर शिक्षण संस्था आणि उद्योगांसाठी काश्मीर खुले करण्यात आल्यामुळे ठराविक लोकांची मक्तेदारी मोडून काढत सर्वांसाठी सर्वांचे काश्मीर उदयास येत आहे.
G 20 चे यजमानपद भारताकडे आल्यानंतर जगातील 75 टक्के व्यापार एकवटलेल्या या समूहाला भारतासाठी एक उत्तम संधी म्हणून सर्वांसमोर आणण्याचा विडा नरेंद्र मोदी यांनी उचलला आणि बहुतेक सर्वच देशांनी या आयोजनाचे मुक्तकंठाने कौतुक केले. G 20 ची व्याप्ती वाढवून आफ्रिकन युनियनला कायम सदस्यत्व देऊन नरेंद्र मोदींनी आपले नेतृत्व आणि दातृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. या आयोजनाची जबाबदारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांभाळली. नरेंद्र मोदी यांची सावली बनून जयशंकर यांनी G 20 चे सारथ्य केले. गेले 9 दिवस जयशंकर हे अमेरिकेत आहेत. आपले अख्खं आयुष्य परराष्ट्र सचिव म्हणून जवळपास 40 देशांतून भारताचे प्रतिनिधित्व करणारे जयशंकर यांना 2019 साली परराष्ट्र मंत्री करण्याचे मोदींचे दूरगामी धोरण असल्याचे त्या वेळीही म्हटले गेले होते. 2024 साठी निवडणुकांचा बिगुल वाजलेला असताना G 20 चा घातलेला घाट आणि त्याआडून मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदललेली प्रतिमा ही पीओकेचा भारतात समावेश होण्याशी जोडला जात आहे. अमेरिकेत 9 दिवसांत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका विशद करण्याचे काम करत असल्याचे राजकारण भारतात रंग भरत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे आणि महत्वाचे उद्दिष्ट म्हणून पीओकेचे भारतात विलीनीकरणाकडे पाहिले जाते. आर्थिक कंगालीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानात व्याप्त काश्मीर मध्ये भारतात येण्याची भूमिका स्पष्टपणे पहिल्यांदाच मांडली जात आहे. गिलगिट, बाल्टीस्तानातून लोंढेच्या लोंढे या मागणीसाठी सरकारच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. अशा वेळी 2024 साठी ही सुवर्णसंधी समजून जयशंकर यांना आंतरराष्ट्रीय शिष्टाई साठी अमेरिकेत पाठवल्याची चर्चा जोर धरत आहे. धक्कातंत्र हे नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य समजले जातात. पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या संधीसाठी मोदी G 20 च्या माध्यमातून पीओके पुन्हा भारतात आणून स्वातंत्र्यापासून अर्धे असलेले काश्मीर चे वर्तुळ पूर्ण करणार का? व्याप्त काश्मीर मधील नागरिकांची प्रचंड इच्छा असली तरी त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम आणि त्याचा मागोवा घेण्यासाठीच तर जयशंकर अमेरिकेत गेले नाहीत ना? याची भारतीयांना उत्सुकता आणि पाकिस्तानला चिंता लागून आहे. बघूया नरेंद्र मोदी 2024 साठीचे हत्यार म्हणून पीओके वापरणार का? तसे झाल्यास सत्तेचे डोहाळे भरवून घेतलेल्या इंडिया आघाडी कोणते वळण घेणार?