ब्लॉग

काँग्रेस अध्यक्ष खरगे भाजपविरोधात मागास जातींचे कार्ड खेळत आहेत का?

मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटक विधानसभा, लोकसभा व राज्यसभेत काॅंग्रेसचे बडे नेते म्हणून ओळखले जातात.

Published by : Siddhi Naringrekar

सुनील शेडोळकर

कर्नाटकातील गुलबर्गा हे काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व गांधी घराण्याचे वफादार म्हणून पक्षात वजन असणारे मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकातील गुलबर्गाचे या राखीव लोकसभा मतदारसंघातून 17 व्या लोकसभा निवडणुकीत आपलेच कार्यकर्ते असलेल्या उमेश जाधव यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटक विधानसभा, लोकसभा व राज्यसभेत काॅंग्रेसचे बडे नेते म्हणून ओळखले जातात. अनुसूचित जाती प्रवर्गातून खरगे गेली अनेक वर्षे गुलबर्ग्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काॅंग्रेसचे प्रतिनिधित्व केले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही खरगे यांनी काम केलेले आहे व सध्या राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडीत आहेत. आपल्या हक्काच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने आपल्याच कार्यकर्त्याला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरविले आणि पक्षाची अन् पैशाची बक्कळ ताकद नवख्या असलेल्या उमेश जाधव यांच्या मागे उभी करून मल्लिकार्जुन खरगे यांना पराभूत करण्याचा धक्कादायक निकाल गुलबर्ग्याच्या मतदारांनी दिला आणि मतदारसंघ आणि इथल्या मतदारांना गृहीत धरणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांचे विमान जमिनीवर आणले.‌ लोकसभेतील विरोधी पक्षनेते असल्यामुळे खरगे यांनीही 2019 ची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीत आपल्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेल्या आपल्या कार्यकर्त्याची समजूत काढण्याचा खरगे यांनी भरपूर प्रयत्न केले, पण भारतीय जनता पक्षाचे पाठबळ असल्याने उमेश जाधव यांनी खरगे यांना प्रतिसाद न देता निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला आणि त्याचा परिणाम म्हणून उमेश जाधव हे खासदार म्हणून निवडून आले. आपल्या घरच्या मैदानावर पानिपत झाल्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांचा भारतीय जनता पक्षावर व विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रचंड राग आहे. राजकारणात हार - जीत ही चालायचीच, पण काही पराभव हे जिव्हारी लागणारे असतात आणि खरगेंसाठी गुलबर्गा मतदारसंघ गमावणे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असल्यापेक्षाही मोठा समजला जातो आणि तोही एका नवख्या उमेदवारांकडून झाला याचे शल्य खरगेंना अधिक बोचणारे आहे. नरेंद्र मोदींनी काॅंग्रेस मुक्त भारत अशी हाक देऊन 2014 साठी देशभर पायाला भिंगरी लावून प्रचार केला आणि भाजपला बहुमत मिळवून देत गेल्या तीन दशकांतील राजकारणात अस्थिरता संपवली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत राजीव गांधींना 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले होते. मल्लिकार्जुन खरगे आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध तसे चांगले राहिलेले आहेत. लोकसभेत काॅंग्रेसला विरोधी पक्षनेते मिळाले आणि या जागेवर मल्लिकार्जुन खरगे यांची वर्णी लागली होती.

गांधी घराण्यातील कुणी होऊ नये अशी मोदींची इच्छा होती. मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव स्वतः मोदींनी लोकसभेत भाषणादरम्यान केला होता. 2017 मध्ये राहुल गांधी यांनी राफेल खरेदीवरून मोदींवर गंभीर आरोप करत फैरी झाडण्यास सुरुवात केली होती. नरेंद्र पंतप्रधान म्हणून दिल्लीत स्थिरावण्या आधीच काॅंग्रेस चा वरचष्मा असलेल्या दिल्लीतील बाबू मंडळींकडून मोदींची नाकेबंदी करण्यात काॅंग्रेसने कोणतीच कसर ठेवली नव्हती. जवळपास साडेतीन वर्षे या बाबू मंडळींना आवर घालण्यासाठी लागला होता नरेंद्र मोदींना. याच कालावधीत राफेल खरेदीचे अर्धवट पेपर लिक झाले होते. ते कोणाच्या सांगण्यावरून झाले होते, या सगळ्यांचा राहुल गांधी यांच्याशी काय आणि कसा संबंध आला याचा भरपूर काथ्याकूट पीएमओत झाल्यानंतर रात्रीतून सीबीआय संचालकांची उचलबांगडी करण्यात आली होती, त्यावेळी काॅंग्रेस ने सीबीआय संचालकांना रातोरात हटविण्याच्या मोदींच्या निर्णयावर रान पेटवले होते. त्यानंतर नरेंद्र मोदींनी पीएमओत मोठ्या प्रमाणात बदल करुन गुजरात केडर दिल्लीत दाखल करण्यात आले. राफेलचा मुद्दा लोकसभा व राज्यसभेतही चर्चेला आणून त्यावर गोंधळ घातला गेला होता.‌ नरेंद्र मोदी यांच्या मै चौकीदार च्या घोषणेला चौकीदार चोर हे असा प्रतिहल्ला राहुल गांधींनी चढवला होता. नव्या सीबीआय संचालकांच्या नियुक्ती साठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली जाते. पंतप्रधानांशिवाय लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि देशाचे सरन्यायाधीश असे तीन सदस्य एकमताने नवे सीबीआय संचालक निवडण्याची प्रथा असताना 2017 साली काॅंग्रेसच्या व विशेष करून राहुल गांधींच्या दबावामुळे मल्लिकार्जुन खरगे यांनी समितीच्या निर्णयामध्ये नव्या संचालक निवडीस आपला विरोध नोंदविल्यामुळे एकमताने होणारी ही निवड बहुमताने करावी लागली होती. ईडी, सीबीआय व इनकम टॅक्स यांचा सरकार विरोधकांवर धाक ठेवण्यासाठी गैरवापर करीत असल्याचा विरोधकांकडून दररोज आरोप करीत असताना या आरोपामागील ही किनारही विचार करायला भाग पाडणारी आहे. 2017 मधील ही घटना भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी विसरलेले नसावेत आणि त्यानंतरच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने गुलबर्गा आणि अमेठी या दोन ठिकाणी सर्व ताकद पणाला लावत गुलबर्गा मतदारसंघातून मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर उमेश जाधव या त्यांच्याच कार्यकर्त्याला निवडले आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पराभूत केले तर अमेठी या गांधी घराण्याच्या पारंपारिक मतदारसंघातून राहुल गांधी यांच्यासमोर स्मृती इराणी यांना उभे करुन राहुल गांधींना पराभवाची धूळ चारली. केरळमधील वायनाड हा सुरक्षित मतदारसंघ समयसूचकता बघून राहुल गांधींनी वेळीच निवडून ठेवला होता म्हणून आज राहुल गांधी लोकसभेत दिसत आहेत. राजकारणात एकमेकांना विरोध होण्याचे प्रकार निवडणुकीत नवे नाहीत पण टोकाचा विरोध आणि ते ही समोरच्याला उखडून टाकण्याचे राजकारण 2019 नंतर वेळोवेळी बघायला मिळाले. मल्लिकार्जुन खरगे यांची वरिष्ठता आणि गांधी परिवाराशी असलेली एकनिष्ठता बघून गुलबर्गा हरल्यानंतर त्यांना राज्यसभेवर घेऊन विरोधी पक्षनेते पदही दिले. काॅंग्रेस पार्टी ही एका परिवाराची पार्टी असल्याचा आरोप नरेंद्र मोदी नेहमीच करत आलेले आहेत. जिथे संधी मिळेल तिथे हा परिवारवाद उकरुन काढला जातो. यामुळेच काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी स्वतः उतरण्यापेक्षा मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष पदासाठी उभे केले आणि ते निवडून आले. त्यानंतर काॅंग्रेसने कर्नाटक जिंकल्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांचा आत्मविश्वास वाढला असून 2024 साठी इंडिया आघाडी उभी करण्यात, जोडण्यात आणि ती वाढवण्यात खरगे यांनी भरपूर मेहनत केली आहे. मोदींकडून जिव्हारी लावणारा गुलबर्गा पराभव मल्लिकार्जुन खरगे अजून विसरलेले दिसत नाहीत तर सीबीआय संचालकांची निवड एकमताने करण्याची परंपरा असताना ती बहुमताने करावी लागली हे मोदी विसरलेले दिसत नाही. म्हणूनच दिल्लीतील G 20 परिषदेत राष्ट्रपतींनी दिलेल्या विदेशी पाहुण्यांसाठीच्या डिनर समारंभास काॅंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले पण राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असूनही काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बोलावणे टाळले. त्यामुळे वेळ बघून एकमेकांचे हिशेब करण्यात मोदी व खरगे व्यस्त दिसतात. नरेंद्र मोदी ओबीसी प्रवर्गातून येतात तर मल्लिकार्जुन खरगे अनुसूचित जातींमधून. मोदींनी G 20 परिषदेत न बोलावल्याचे शल्य खरगेंना बोचत असेल म्हणूनच जातींचा आधार घेत नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्याची संधी खरगे 5 राज्यांच्या निवडणुकीत शोधत आहेत.

छत्तीसगढमधील सभेत खरगेंनी आपल्याला झालेल्या जखमेवरील खपली आपणच काढली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दलित असल्यानेच मोदींनी त्यांना नव्या संसद भवनाच्या पायाभरणी समारंभास व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्यानेच संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमास बोलावले नाही असे सांगून भाजपविरोधात मागस जातींचे कार्ड खेळत आहेत की काय अशी शंका घेण्यास जागा आहे. या दोन्ही नेत्यांना राष्ट्रपती हे नरेंद्र मोदी यांनीच केले असल्याची वस्तुस्थिती असूनही खरगे असं बोलल्याने राजकारण सुरू झाले आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांचा काळ आहे. काॅंग्रेस आणि भाजप 2024 च्या तयारीच्या उद्देशाने या निवडणुकांकडे पाहात आहेत. त्यामुळे राजकारण होणारच. पाहूया एकमेकांवर व्यक्तिगत हल्ले करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नांवर राजकारण्यांनी जर आवाज उठवला तर घसरत असलेल्या राजकारणाचा उंचावण्यास मदत होईल, अन्यथा राजकारणापासून दूर जात असलेला समाज अजून जास्त दूर जाण्यास वेळ लागणार नाही. बघूया, जबाबदार राजकीय पक्ष काय भूमिका घेतात....!

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु