'इसापनिती', प्राण्यांच्या माध्यमातून मानवी स्वभावाचे अचूक विश्लेषण करणा-या गोष्टी. या 'इसापनिती'ने खूप काही गोष्टी लहानपणीच शिकवल्या. आता माकड बोललंच कसं आणि वाघ हसलाच कसा, असे प्रश्न निरर्थक आहेत. त्या गोष्टीच्या खाली 'तात्पर्य' म्हणून दिलेलं असतं, ते महत्त्वाचं. त्यातील काही गोष्टी आजही आठवणीत आहेत. त्यापैकी ही एक –
अगदी कडाक्याची थंडी पडलेली. हिमवृष्टी सुरू होती. त्यामुळे एका घराच्या वळचणीला एक बोकड येऊन उभे राहिले. घरमालकाला बाहेर चाहूल आल्याने त्यानं बाहेर डोकावून पाहिलं तर, हे बोकड उभं होतं. त्याने त्याला घरात घेतलं आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू असताना घरमालक आपले हात एकमेकांवर चोळत होता आणि त्यावर फुंकर मारत होता. बोकडानं त्याला विचारलं – 'काय करतोयस?' घरमालक म्हणाला – 'थंडी असल्यानं हातावर गरम फुंकर मारत आहे.'
'हं…'
पुन्हा गप्पा सुरू होतात. रात्रीबरोबर थंडीही वाढत जाते. घरमालक म्हणतो – 'मी गरम-गरम सूप घेऊन येतो.' सूप पिता-पिता बोकडाचं लक्ष जातं, की घरमालक चमच्यात सूप घेतल्यानंतर त्यावर फुंकर मारत आहे. हे पाहून तो पुन्हा विचारतो – 'तू आता काय करतोयस?' घरमालक म्हणतो – 'सूप गरम आहे, ते फुंकर मारून गार करतोय.'
हे ऐकताच बोकड उठून सरळ घराबाहेर जायला निघतं. त्याला थांबवत घरमालक विचारतो – 'काय झालं? का चाललास?' बोकड म्हणतो – जो आपल्या एकाच तोंडातून लागोपाठ गरम आणि गार हवा सोडू शकतो, त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार!'
—————————
आपण एखाद्या आप्त-मित्राकडे जातो. तिथं गप्पांच्या ओघात 'कसा आलास?', असा प्रश्न येतो. आपण म्हणतो – 'बसनंच आलो. ती बरी पडते. माझ्या घराजवळ स्टॉप आहे. इथं अमुक ठिकाणी उतरल्यावर दहा मिनिटांत तुझ्याकडं. रेल्वेनं यायचं म्हटलं तर, तिकिटासाठी लाइन लावायची… ब्रिज चढ-उतार करायचे… त्यात ट्रेनला गर्दी… आणि उतरल्यावर स्टेशन परिसरातील गर्दीतून वाट काढत यायचं… त्यापेक्षा बस बरी.'
पुन्हा केव्हा तरी, आपण त्याच आप्त-मित्राकडं जातो. गप्पा सुरू असताना सांगतो – 'ट्रेनने आलो. बसने यायचं म्हणजे किती ट्राफिक… वेळही जातो… त्यात पोल्युशन… डोळ्यांची अगदी जळजळ होते. ट्रेनच बरी.'
——————-
आॅफिसला जायला उशीर झालेला असतो. धावत-पळत आपण स्टेशन गाठतो. नेहमीची लोकल प्लॅटफॉर्मला लागत असते… आपण गर्दीत शिरून गाडी पकडतो…. चौथी सीट मिळते. अर्थात बुड टेकायला पुरेशी जागा नसते, आपण शेजारच्यांना सरकण्याची विनंती करतो, ते जागच्या जागी जरासे हलतात, पण फारसा फरक पडत नाही. मग आपण खिडकीत बसलेल्याकडे दात-ओठ खात, चरफडत बघतो आणि रागात पुटपुटतो. तो मात्र एक तर आपल्या मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेला असतो किंवा झोपायच्या तयारीत असतो.
दुस-या दिवशी आपण वेळेत स्टेशनवर पोहोचतो. लोकल प्लॅटफॉर्मला लागत असतानाच, आपण 'जम्प' करतो आणि 'विंडो' पकडतो. चौथ्या सीटवर बसणारा, शेजारच्यांना सरकण्याची विनंती करतो… पुढं तेच…
—————–
अशा प्रकारे परस्पर विरोधी घटना असली तरी, त्याची कारणमीमांसाही केली जाते. हे सर्व अनाहूतपणे होते.
————————-
मृत्यूच्या बाबतीत देखील असेच काहीसे आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू प्रदीर्घ आजाराने होतो. त्याच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी नातेवाईक घरी येतात. या त्रासातून तो किंवा ती 'सुटला' किंवा 'सुटली', असे म्हटले जाते.
काहींना चालता-बोलता अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि तासा-दीड तासात सर्वच संपते. आप्त-मित्र परिवार, नातेवाईक भेटायला येतात. अनेक जण सांगतात – 'मरण चांगलं आलं… बिछान्याला खिळून राहिले नाहीत… सेवा करून घेतली नाही…' वगैरे वगैरे…
काय असतं, आपली प्रिय व्यक्ती जेव्हा अशी जाते ना, त्या दु:खाची तीव्रता खूप असते… मग ती आजारपणानं गेली असेल वा अचानक धक्का देऊन! तो घाव खूप खोलवर असतो, जखम भरली तरी व्रण हा राहतोच… आणि आतमध्ये ठसठसणं थोडंफार सुरूच असतं. कधी तरी विषय निघाल्यावर किंवा एकांतात त्या व्यक्तीची आठवण बेचैन करून जाते, अशा वेळी त्या व्यक्तीचं 'सुटणं' किंवा 'मरण चांगलं आलं' हे सांत्वन, त्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम करतं… ही फुंकर गार किंवा गरम नसते… मन सावरणारी असते!