सकाळ असो किंवा संध्याकाळ लोकांना कधीही चहा दिला, तरी ते कधीही चहाला नाही म्हणणार नाहीत. चहा हे आपल्यापैकी बहुतेकांच्या आवडत्या पेयांपैकी एक आहे. अनेकांना दिवसाची सुरुवात एक कप चहाने करायला आवडते. काही लोक दिवसभरातून ४-५ वेळा देखील चहा पिण्यास महत्व देतात. परंतु अधिक प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. म्हणूनच लोक नेहमीच्या चहाऐवजी हर्बल चहाचा पर्याय निवडतात. बऱ्याचवेळा चहामध्ये साखरेऐवजी मध वापरणे हा आरोग्यदायी पर्याय आहे की नाही याबद्दल लोक अनेकदा गोंधळलेले असतात. बऱ्याच लोकांना वाटतं की जर तुम्ही तुमच्या चहातून साखर काढून टाकली तर चहा आरोग्यास हानी पोहोचवत नाही. त्याचबरोबर काही लोकांचा असा विश्वास आहे की चहामध्ये साखरेऐवजी मध आणि गूळ यासारख्या पदार्थांचा समावेश केल्यास तो चहा आरोग्यास लाभदायक ठरतो. परंतु हा आपला गैरसमज आहे.
आता प्रश्न इथही उपस्थित होतो की चहामध्ये साखरेऐवजी मध वापरणे खरोखरच आरोग्यास लाभदायक ठरतं का? आयुर्वेदिक तज्ञ डॉ. अलका विजयन (BAMS -Thyroid & Gynecological Hormone) यांच्या मते साखरेऐवजी मधाचा वापर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे यात शंका नाही. परंतु चहाच्या बाबतीत असं होत नाही. साखरेपेक्षा मध हा उत्तम पर्याय आहे हे मात्र सत्य. हे चहासाठी नव्हे तर इतर गरम पेयांसाठी.
डॉ. अलका म्हणतात की मध कधीही गरम करू नये. पण असे बरेच लोक आहेत जे दिवसभरातून ३-४ कप चहा पियत असताना आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं समजून साखरेऐवजी मध वापर करतात. अनेकजण रोज मध-लिंबू-पुदिन्याचा चहा घेतात पण खऱ्या अर्थाने ते तुमच्या आरोग्यालाच हानी पोहोचवेल याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.