१. काकडी आणि बदाम स्क्रब
काकडी किसून तिचा रस काढून टाका. यामध्ये भिजलेल्या दोन बदामांची पेस्ट टाका. हे मिश्रण चेहऱ्याला लावून ४ ते ५ मिनिटे मसाज करा. यानंतर साधारण ८ ते १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावरचे डाग काढून टाकण्यासाठी हा उपाय तर फायदेशीर ठरतोच. पण काकडीमध्ये असणारे भरपूर पाणी त्वचेचे पोषण करून तिला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. तसेच बदामामध्ये असणारे व्हिटॅमिन ई त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते.
२. पुदिना, कढीपत्ता स्क्रब
उन्हाळ्यात पुदिना- कढीपत्ता स्क्रबदेखील त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. हा उपाय करण्यासाठी पुदिन्याची पाने, मध आणि भिजवलेले तीळ यांची पेस्ट तयार करा आणि त्याने चेहऱ्यावर मसाज करा. गोलाकार दिशेने आणि हलकासा जोर देऊन मसाज करावा. यानंतर १० ते १२ मिनिटांनी चेहऱ्यावरचा लेप सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. पुदिना थंड असल्याने तो उन्हाळ्यात त्वचेसाठीही अतिशय उपयुक्त ठरतो.
३. टरबूज स्क्रब
उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासोबतच त्वचेची काळजी घेण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. कारण टरबुजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. यामुळे त्वचेचे होणारे डिहायड्रेशन रोखले जाते. उन्हाळ्यात शरीरातील पाणी पातळी संतूलित ठेवण्यासाठीही टरबूज खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच टरबूज स्क्रब त्वचेसाठीही अतिशय पोषक ठरतो. टरबूज स्क्रब करण्यासाठी टरबुजाच्या फोडींचा पांढरट भाग वापरावा. फोडीवर थोडीशी पिठीसाखर टाका आणि त्याने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. ५ ते १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. टरबूज त्वचेला थंडावा देते तर साखरेमुळे त्वचा चमकदार होते.