अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात.
या शुभदिनी सोनं किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. तसेच अनेक व्यापारी दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या जमाखर्चाच्या वह्या, पेन अशा अनेक वस्तूंची पूजा करतात. व्यापारी या दिवसापासून आपले नवीन व्यापारी वर्ष सुरु करतात. ज्याला विक्रमसंवत्सर असे म्हटल जाते. याशिवाय सूवासिनींकडून पतीची ओवाळणी केली जाते. यामुळे दोघांनी दीर्घयुष्य लाभते अशी श्रद्धा आहे.
बलिप्रतिपदेची पूजा
दिवाळी पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा पूजेला विशेष महत्व असते. बलिप्रतिपदेतील बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. त्याच्याकडून तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने त्याला मारले. पण हा राजा जनतेची खूप काळजी घ्यायचा. म्हणून ग्रामीण भागात आजही अनेक महिला भावाला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” अशी म्हण म्हणताना दिसतात.
दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त
१४ नोव्हेंबर – सकाळी ६ वाजून १४ मिनिटे ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.
तिथी – शु. प्रतिपदा १४.३६
नक्षत्र – अनुराधा २७.२३
योग – शोभन १३.५५
करण – बालव २६.१५