उमाकांत आहिरराव -
धुळे : मागच्या काही दिवसांत हिंस्त्र श्वापदं मानवी वस्तीकडे येण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशातच धुळे (Dhule) जिल्ह्यात बिबट्या (Leopard) विहीरीत पडल्याची घटना समोर आली आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून बिबट्यांची दहशत कायम आहे. शिकारीच्या शोधात असलेला एक बिबट्या ढवळी विहीर गावातल्या एका विहिरीत पडला.
विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. विहिरीत पाणी अधिक असल्यानं बिबट्याला त्रास होऊ नये यासाठी विहिरीतल्या पाण्याचा उपसा करण्यात आला. पिंपळनेर पोलीस व वन विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वन विभागाला मोठी शिकस्त करावी लागली.
पोलीस आणि वनविभागाने मिळून मोठ्या शिताफीनं पिंजरा लावून बिबट्याला बाहेर काढलं. बिबट्याला सुरक्षीत विहीरीच्या बाहेर काढल्यानंतर वन विभागाने त्याला ताब्यात घेतलं, एकुणच हा सर्व थरार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला.