संपूर्ण जगभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. "ना टेस्ट आहे, ना हॉस्पिटलमध्ये बेड आहे, ना व्हेन्टिलेटर आहे, ना ऑक्सिजन आहे, कोरोनाची लसही नाही. फक्त एका उत्सवाचा ढोंग आहे. पंतप्रधानांना याची कोणतीही चिंता नाही."
11 एप्रिलपासून देशात लस उत्सव सुरू करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा केली होती .अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवणं हा यामागचा मुख्य हेतू होता. 'लस उत्सव' या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात आलं. त्यासाठी काही कलाकार आणि नेतेमंडळींनीही पुढाकार घेत नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतची जनजागृती करण्यासाठी योगदान दिलं आहे.