कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत वक्तव्य केले की कोणाच्याही बायका-मुलांवर आरोप करणे हा अक्करमाशीपणा आहे. यावरच आता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यात गुंतवणूक करणार असेल तर त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल, असा आणखी एक नवा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असेल तर उद्धव ठाकरे यांनाही उत्तर द्यावे लागणार आहे, असे सांगतानाच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. उद्धव ठाकरे हे बायकोच्या नावाने 19 बंगल्याचे घोटाळे करत आहेत, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, सुनेत्रा पवार या दोन डझन कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. तर तीन डझन कंपन्यांमध्ये भागधारक मालक आहेत.
बहिणी, मुलगा, यजमान त्यांचा मुलगा यांच्या नावेही बेनामी कंपन्या आहेत. हे आधी एक होल्डिंग कंपनी तयार करतात, मग त्याच्या खाली कंपन्या या करतात. सरकारी मालमत्ता कवडीमोल दरात विकत घेतात. पवार कुटूंबियांसाठी राज्याची जमीन चमकणारी आहे. जरंडेश्वर कंपनी यांचीच आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचीच आहे. पदाचा दुरूपयोग करून त्यांनी हे सर्व मिळवलं आहे. उपमुख्यमंत्री स्वत:चा कारखाना विकत घेतात. यांचेच बिल्डर कंपन्या विकत घेतात, असा दावाही त्यांनी केला.