उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ प्लॅटफॉर्मनं टाईम मासिकाच्या सर्वात प्रभावशाली १०० कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. भारतात डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी जिओ प्लॅटफॉर्मच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. 'गेल्या काही वर्षात जिओने भारतातील सर्वात मोठे ४ जी नेटवर्क तयार केले आहे. जिओ सर्वात कमी दराने ४ जी सेवा देत आहे. रिलायन्स जिओ केवळ ५ रूपये दरात १ जीबी डेटा देत आहे,' असं टाईम मॅगझिननं म्हटलं आहे. जगभरातील गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल कंपनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत. ते रिलायन्स जिओच्या ४१ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी जिओमध्ये २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. जिओ प्लॅटफॉर्म फेसबुकच्या सहकार्याने व्हॉट्सअॅपवर आधारित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित करीत आहे. त्याचवेळी, रिलायन्स जिओ स्वस्त ५ जी स्मार्टफोन बनविण्यासाठी गुगलसोबत काम करत असल्याचंही टाईम मॅगझिननं म्हटलंय. भारतात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडला इनोव्हेटर्स श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे.